मुंबई Hearing About NCP Party : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावर अजित पवार यांनी दावा ठोकल्यानंतर हा वाद सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुरू झाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सोमवारी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट आमने-सामने येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे उद्याच्या सुनावणीला हजर राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.
अजित पवार गटाचे दावे खोडले: केंद्रीय निवडणूक आयोगासमोर 2 नोव्हेंबरला सुनावणी पार पाडली होती. शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंगवी यांनी अजित पवार गटाकडून करण्यात आलेल्या दाव्यांना खोडले. शरद पवार गटाकडून युक्तिवाद आटोपल्यानंतर सुनावणीची पुढची तारीख देण्यात आली होती. त्या अनुषंगाने उद्या अर्थात सोमवारी 20 तारखेपासून पुन्हा एकदा सुनावणीला सुरुवात होत आहे.
शरद पवार, सुप्रिया सुळे सुनावणीला राहणार उपस्थित: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सुनावणीला नेहमीप्रमाणे उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी ते उद्या दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती समोर येत आहे. सुनावणी पूर्वी दिल्लीत शरद पवार गटाची रणनीती बाबत बैठक होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह कोणाचे याबाबत दिल्लीतील केंद्रीय निवडणूक आयोगासमोर होणाऱ्या सुनावणीकडे सर्व राज्याचं लक्ष लागलं आहे.
2 नोव्हेंबरच्या सुनावणीत काय झालं? केंद्रीय निवडणूक आयोगाच्या 2 नोव्हेंबरच्या तब्बल दोन तास चाललेल्या सुनावणीत शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनुसिंगवी यांनी अजित पवार गटाचे सर्व दावे खोडले. त्यासोबत अजित पवार गटावर गंभीर आरोप केला. अजित पवार याच्याकडे कोणतेही समर्थन नाही. आम्ही निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे की, खोट्या कागदपत्रांबाबत त्याला दंड करावा. आम्हाला विश्वास आहे की, सत्याचा विजय होईल असं अभिषेक मनुसिंगवी यांनी म्हटले होते. तर अजित पवार गटाकडून याबाबत बोलताना सुनील तटकरे म्हणाले होते की, प्रक्रियेत तांत्रिक पद्धतीनं बाबी उपस्थित करून वेळ काढूपणा करण्याचा प्रयत्न केला गेला. सलग सुनावणी करण्यात यावी, अशी मागणी आम्ही केली. काही तांत्रिक बाबी आम्ही न्यायल्यासमोर मांडणार असल्याचे तटकरे यांनी म्हटले होते.
हेही वाचा:
- Sanjay Raut on EC : शिवसेना कुणाची? पाकिस्तानला माहिती, पण निवडणूक आयोगाला नाही-संजय राऊत
- Gram Panchayat Election 2023 : सत्ताधारी भाजपाला जर मीडियाकडे जावं लागत असेल तर हे गृहमंत्र्यांचं अपयश - सुप्रिया सुळे
- Supriya Sule On Ajit Pawar : वयाच्या ८३ व्या वर्षी व्यक्तीला घराबाहेर काढण्याची ही कुठली मराठी संस्कृती सुप्रिया सुळेंचा सवाल