मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारसोबत निर्णय घेतला आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली. सर्वांचा विचार करून निर्णय घेतला आहे. विकासाला महत्त्व दिले पाहिजे. गेल्या नऊ वर्षांपासून मोदी चांगले काम करत आहेत. त्यांच्या विकासाचा एकमेव मुद्दा समोर ठेवऊन हा निर्णय घेतला असल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
देशाला खंबीर नेतृत्वाची गरज : अजित पवार म्हणाले, देशाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे. मी वर्धापनदिनी स्पष्ट भूमिका मांडली होती. तरुणांना संधी देणे गरजेचे आहे. नवीन कार्यकर्ते पुढे आणले पाहिजेत. तसे मी प्रयत्न करणार आहे. कोरोना असूनही विकास ही आमची भूमिका होती. केंद्राचा निधी राज्य सरकारला कसा मिळेल याचा विचार केला पाहजे. आम्ही घेतलेला निर्णय सर्व आमदारांना मान्य आहे. राष्ट्रवादी पक्ष म्हणून आम्ही सत्तेत आहोत. येणाऱ्या आगामी निवडणुक राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हावरच आम्ही लढवणार असल्याचे अजित पवार म्हणाले.
पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करणार : येत्या काळात राष्ट्रवादी पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करणार, सर्वांना समान संधी देण्यासाठी पर्यत्न करणार असल्याचे पवार म्हणाले. शुक्रवारीच मी विरोधी पक्ष नेते पादाचा राजीनामा दिला होता. काही आमदार विदेशात असल्यामुळे येऊ शकले नाही. काही आज येणार आहेत. त्यांच्याशी फोनवर चर्चा करण्यात आल्याची माहिती देखील अजित पवार यांनी दिली आहे.
9 आमदारांनीही घेतली मंत्रिपदाची शपथ : अजित पवार आता महाराष्ट्र राज्याचे नवे उपमुख्यमंत्री असून त्यांच्यासोबत 9 आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी पक्षावर दावा केला आहे. आगामी निवडणुका राष्ट्रवादी पक्षाअंतर्गतच लढवल्या जातील असे त्यांनी म्हटले आहे. आज अजित पवार यांच्या सोबत, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीम, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, संजय बनसोडे, धर्मरावबाबा आत्राम, अनिल भाईदास पाटील आदीनी मंत्रीपदाची शपत घेतली आहे.