मुंबई : शरद पवारांनी राजीनामा दिल्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. निवड समितीच्या बैठकीने शरद पवारांचा राजीनामा फेटाळल्यानंतरही काही फरक पडलेला दिसून आलेला नाही. निवड समितीची बैठक सुरू असताना एका कार्यकर्त्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला.
शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर नवीन अध्यक्ष पदी शरद पवारच असावेत, असा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह नेत्यांचा आग्रह आहे. निवड समिती अध्यक्ष पदाच्या बैठकीबाबत निर्णय घेत असताना कार्यालयाबाहेर असलेले राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांच्या भावना अनावर झाल्याचे दिसून आले. अनेक कार्यकर्त्यांनी मी साहेबासोबत आहे, अश्या टोप्या घातल्या होता. साहेबांनी निर्णयाचा फेरविचार करावा, अशी भावना कार्यकर्त्यांनी बोलवून दाखविली आहे. शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड, प्रतोद अनिल पाटील यांनी राजीनामे दिले आहेत. अशा घडामोडी असतानाही पवारांनी अद्याप राजीनामा मागे न घेतल्याने अनेक कार्यकर्ते व नेते अस्वस्थ आहेत.
निवृत्तीच्या घोषणेने सर्वांना टाकले कोड्यात-स्वतःची राजकीय वाटचाल ठरवण्यासाठी शरद पवार यांनी 1999 मध्ये काँग्रेस सोडल्यानंतर राष्ट्रवादीची स्थापना केली. त्यांनी स्थापन केलेल्या आणि अध्यक्षपदी असलेल्या पक्षाचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय जाहीर करून पवार यांनी सर्वांनाच गोंधळात टाकले. त्यांनी आत्मचरित्र प्रकाशन समारंभात सांगितले होते की ते राष्ट्रवादीचे अध्यक्षपद सोडत आहेत. परंतु सार्वजनिक जीवनातून निवृत्त होत नाहीत.
पक्षातील गटबाजीची चर्चा- अजित पवार आणि काही आमदार सत्ताधारी भारतीय जनता पक्षाशी हातमिळवणी करतील अशी अटकळ असताना ही घोषणा करण्यात आली. परंतु माजी उपमुख्यमंत्र्यांनी आपण जिवंत असेपर्यंत राष्ट्रवादीसोबत राहणार असल्याचा दावा करून सर्व वावड्या असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादीतील नेत्यांनी भाजपच्या नेत्यांशी जवळीक साधल्याने राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर होती, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला होता. पक्षातील गटबाजी टाळण्यासाठीच त्यांनी हा निर्णय घेतल्याची शंका राऊत यांनी बोलून दाखविली होती. दुसरीकडे राज्याचे प्रदेशाध्याक्ष जयंत पाटील यांना पक्षाच्या बैठकीबाबत निमंत्रण नसल्याची माहितीदेखील समोर आली होती.
हेही वाचा-Proposal to Reject Sharad Pawar Resignation : शरद पवार यांनी आपला कार्यकाळ पूर्ण करावा-प्रफुल पटेल