मुंबई - चेंबूर लैंगिक अत्याचाराच्या घटनेला १ महिना पूर्ण झाला. त्यानंतर आता त्या पीडितेचा मृत्यू झाला. मात्र, राष्ट्रवादीने मोर्चा काढल्यानंतर राज्य महिला आयोगाने अहवाल मागविला. त्यामुळे महिला आयोग झोपेत होते का? असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.
चेंबूर लैंगिक अत्याचारप्रकरणी पीडित तरुणीला न्याय देण्यासाठी आम्ही तिच्या पाठीशी आहोत. पोलिसांसोबत याविषयी चर्चा केली. मात्र, त्या चर्चेवर आम्ही अजिबात समाधानी नाही. याप्रकरणी एसआयटीची पारदर्शक चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. शुक्रवारी काढलेल्या मोर्चादरम्यान त्या बोलत होत्या.
राज्यात जागोजागी लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत आहेत. गुरुवारीच ठाण्यात एक घटना घडली. चाळीसगाव, पुणे आदी ठिकाणी अत्याचाराच्या घटना घडल्या. त्यामुळे सरकार महिला मुलींना सुरक्षा देण्यात सातत्याने अपयशी ठरले असल्याची टीका सुप्रिया यांनी केली. तसेच गृहमंत्र्यांनी याची जबाबदारी घेऊन पीडित मुलींना न्याय देण्याची मागणी केली.
जालन्यातील 19 वर्षीय तरुणीवर एक महिन्यांपूर्वी चुनाभट्टी परिसरात लैंगिक अत्याचार करण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वी तिचा औरंगाबाद येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. पीडित तरुणीला न्याय मिळावा व अन्याय करणाऱ्या 4 नराधमावर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी शुक्रवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसने लाल डोंगर ते चुनाभट्टी पोलीस ठाणे असा मोर्चा काढला होता. खासदार सुप्रिया सुळे या मोर्चाचे नेतृत्त्व केले.
सरकार केवळ यात्रा काढून कमळ फुलवण्याचे काम करीत आहे. मात्र, राज्यातील लहान-लहान कळ्या कोमेजत आहेत. त्यांच्यासाठीच काम करण्याची गरज असल्याचे सुप्रिया म्हणाल्या.