मुंबई : नागालँड राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या 7 आमदार, पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. नागालँड राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष वांथुंगो ओडुओ यांनी कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेश प्रमुख सुनील तटकरे यांची दिल्लीत भेट घेतली. त्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्या गटाला जाहीर पाठिंबा दिल्याचे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते जीएस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी सांगितले.
शरद पवारांना मोठा धक्का : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार यांना राष्ट्रवादीच्या बहुतांश आमदारांचा पाठिंबा आहे. अजित पवार यांनी पक्षावर दावा केला असून भाजपसोबत त्यांनी सत्तेत सहभाग घेतला आहे. अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यासोबतच मंत्रिमंडळात अर्थ, सहकार आणि कृषी अशी महत्त्वाची खाती अजित पवार यांच्याकडे आहेत. मात्र पुरोगामी विचार पुढे नेणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते. त्यामुळे आता नागालॅंडमधील सात आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा दिल्याने शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. अजित पवारांनी नागालॅंडमधील राष्ट्रवादीचे आणखी सात आमदार फोडले आहेत.
अजित पवारांना कोणत्या आमदारांचा पाठिंबा? : नागालँडमधील राष्ट्रवादीच्या सात आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा दिला आहे. एवढेच नाही तर नागालँडमधील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीही आपण अजित पवार यांच्यासोबत असल्याचे सांगितले आहे. आमदार आणि पदाधिकाऱ्यांनीही अजित पवारांना साथ दिल्याने राष्ट्रीय पातळीवर शरद पवारांना धक्का बसल्याचे बोलले जात आहे. यामध्ये वाय. मानखा ओकोन्याक, ए पोंगशी फोम, नामरी नचांग, पिक्टो, एस. तोइहो येप्थो, वाय. म्होंबेमो हूमत्सो आणि पी. लॉन्गॉन या आमदारांचा समावेश आहे.
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन त्यांच्याबरोबर गेलेल्या इतर ८ आमदारांना मंत्रिपदाची शपथ घेऊनच मोठा धमाका केला होता. पहाटेच्या शपथविधीनंतर अजित पवारांचे हे दुसरे बंड होते. त्यानंतर त्यांच्यामागे आता देशपातळीवरही राष्ट्रवादीचे लोक जोडले जात आहेत. त्यामुळे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
हेही वाचा - NDA Meeting in Delhi : राष्ट्रवादी काँग्रेस हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा अविभाज्य भाग- प्रफुल्ल पटेल