मुंबई MLA Disqualification Case : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करत भाजपासोबत राज्यात सरकार स्थापन केलं. त्यामुळं शिवसेनेच्या आमदारांना अपात्र ठरवण्याची याचिका ठाकरे गटानं विधानसभा अध्यक्षांकडं दाखल केली होती. या याचिकेवर तारीख पे तारीख सुरू सुरू आहे. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेच्या सुनावणीचं वेळापत्रक निश्चित झालं आहे.
सुनावणीचं वेळापत्रक निश्चित : 2 जुलै 2023 रोजी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी त्यांच्या आठ सहकाऱ्यांसह शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा देत मंत्रीपद स्वीकारलं होतं. त्यानंतर 40 हून अधिक आमदार अजित पवार यांच्यासोबत गेल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे राष्ट्रवादी नेमकी कुणाची असा प्रश्न निर्माण झाला होता. तर, दुसरीकडं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांकडं याचिका दाखल केली होती. त्याविरोधात अजित पवार गटानं देखील विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडं याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी 12 दिवसाचं वेळापत्रक निश्चित करण्यात आलं आहे.
असं आहे वेळापत्रक :
6 जानेवारी 2024 - राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये उत्तराची कागदपत्रे एकमेकांना दिली जाणार.
8 जानेवारी 2024 - याचिकेत अधिक, अतिरिक्त माहिती जोडण्याची वेळ मिळणार.
9 जानेवारी 2024 - फायली, अतिरिक्त कागदपत्रं पटलावर आणली जाणार, मात्र 9 तारखेनंतर कोणतीही नवीन कागदपत्रं जोडता येणार नाहीत. त्यानंतर अशा मागणीचा विचार देखील केला जाणार नाही, असं स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे.
11 जानेवारी 2024 - याचिकेशी संबंधित कागदपत्रांची तपासणी तसंच पडताळणी होणार. पहिल्या दिवशी शरद पवार गट तसंच अजित पवार गटानं सादर केलेल्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येईल.
12 जानेवारी 2024 - याचिकेशी संबंधित कागदपत्रांची तपासणी, पडताळणीचा दुसरा दिवस. शरद पवार गटानं सादर केलेल्या कागदपत्रांची अजित पवार गटाकडून छाननी केली जाणार आहे.
14 जानेवारी 2024 - सुनावणीच्या कार्यवाहीमध्ये कागदपत्रं समाविष्ट करण्यासाठी किंवा वगळण्यासाठी अर्ज करण्याचा दिवस असणार आहे.
16 जानेवारी 2024 - विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर प्रत्यक्ष सुनावणी सुरू करणार. तसंच त्यातील विषय नक्की करणार.
18 जानेवारी 2024 - दोन्ही गटांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यास वेळ दिला जाईल.
20 जानेवारी 2024 - अजित पवार गटाच्या साक्षीदारांची उलट तपासणी केली जाणार.
23 जानेवारी 2024 - शरद पवार गटाच्या साक्षीदारांची उलट तपासणी केली जाणार.
25 ते 27 जानेवारी 2024 - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांचा अंतिम युक्तिवाद संपेल.
निर्णय देण्याचं आव्हान : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर 10 जानेवारीपर्यंत शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर निर्णय घेण्याची शक्यता आहे. राहुल नार्वेकर यांची 4 तारखेला तब्येत बिघडल्यामुळं सुनावणी झाली नव्हती. त्यामुळं राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील याचिकांवर 31 जानेवारीपर्यंत निर्णय देणं, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आव्हान असणार आहे.
हेही वाचा -