मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सचिन अहिर हे आज राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश करणार आहे. सचिन अहिर हे कार्यकर्त्यांसह मातोश्रीवर दाखल झालेत. थोड्याच वेळात ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत सेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांच्या शिवसेना प्रवेशावर राष्ट्रवादी काँग्रेसने मौन बाळगले आहे.
अहिर हे आपले संस्थांन वाचविण्यासाठी असा निर्णय घेऊ शकतील, अशी शक्यता एका वरिष्ठ नेत्याने व्यक्त केली आहे. मागील वर्षभरापासूनच अहिर हे मुंबई प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्षात अत्यंत निष्क्रिय झाले होते. त्यामुळेच त्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ काढून सेनेचे शिवधनुष्य हाती घेण्याचा निर्णय घेतला असावा, अशा प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या नेत्यांमधून उमटत आहेत.
अहिर यांचा सेनेत प्रवेश होणार असल्याचे निश्चित बोलले जात असले तरी त्यांनी अद्यापही राष्ट्रवादीच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला नाही. यामुळे त्यांनी पक्ष सोडला, असे आम्ही स्पष्टपणे सांगू शकत नसल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते क्लाईड क्रॅस्टो यांनी सांगितले. मुंबईत आम्ही चांगल्या प्रकारे कामे केली असून प्रदेशाध्यक्ष म्हणून अहिर हे चांगले काम करत होते.