मुंबई - लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजप-सेना युतील घवघवीत यश मिळाले तर आघाडीतील काँग्रेसचा मानहाणीकारक पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेसलाही अपेक्षित यश मिळाले नाही. शिवाय पार्थ पवारांच्या रुपाने पवार कुटुंबाला पहिल्यांदाच पराभवाचे तोंड पाहावे लागले. या सर्व घडामोडीमध्ये शरद पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, त्यांच्या प्रंचड आशेला म्हणावे तसे यश मिळाले नाही. दरम्यान, या निकालानंतर शरद पवारांनी इन्स्टाग्रामवर ‘जिंकलो नसलो, तरी हरलो नाही’ या आशयाची पोस्ट टाकून कार्यकर्त्यांना खचून न जाण्याचे आवाहन केले आहे.
या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला ५ जागांवर समाधान मानावे लागले. कोल्हापूर, माढा, मावळ या सारख्या महत्वाच्या जागा राष्ट्रवादीला गमवाव्या लागल्या. पवारांचा बालेकिल्ला असलेला बारामती मतदारसंघ राष्ट्रवादीने राखला तरीही भाजपच्या कांचन कुल यांनी निवडणुकीत कडवी झुंज दिली आहे. मात्र, पार्थ पवारांच्या मावळमधील पराभवाने पवारांच्या कुटुंबाने पहिल्यांदाच हार पाहिली आहे.
या सर्व घडामोडीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी थकलो आहे जरी, अजून मी झुकलो नाही; जिंकलो नसलो तरी अजून मी हरलो नाही, अशा आशयाची पोस्ट इस्टांग्रामवर टाकली आहे. या त्यांच्या पोस्टमध्ये प्रचंड आशावादी असलेली 'राष्ट्रवादी पुन्हा..!' नव्या दमाने संकटाला सामोरे जायला तयार आहे. कारण अजून मी संपलो नाही असे सांगत पवारांनी कार्यकर्त्यांना मानसिक धैर्य दिले आहे.