मुंबई - राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारकडून कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपायोजनांची कठोर अंमलबजावणी केली जात आहे. मात्र, दुसरीकडे पूजा चव्हाण प्रकरणावरून चर्चेत असलेले मंत्री संजय राठोड यांनी मंगळवारी पोहरादेवी येथे मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केले. पोहरादेवी येथे दर्शनासाठी गेलेल्या संजय राठोड यांनी बंजारा समाजातील हजारो समर्थकांना एकत्र करून नियमांचा आणि सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडवला. यावर महाविकास आघाडी सरकारचे शिल्पकार शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे कोरोना काळात नियमांना छेद देत केलेल्या शक्तीप्रदर्शनामुळे महाविकास आघाडीच्या प्रतिमेला कुठे ना कुठे धक्का बसत आहे, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. त्या पार्श्वभूमीवर पवार यांनी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन या संबंधीची नाराजी देखील व्यक्त केली असल्याची माहिती समोर येत आहे.
जनतेत वेगळा संदेश जाईल- पवार
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करा, अशा प्रकारचे आवाहन करूनही जर मंत्रिमंडळातील मंत्री त्या आवाहनाला प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे जनतेत वेगळा संदेश जाईल. तसेच विरोधक देखील यामुळे राज्यसरकारला धारेवर धरत आहेत. अशा प्रकारची चर्चा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात झाली. त्यामुळे आता या संदर्भात नेमकं मुख्यमंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई करणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.
पोहरादेवी येथील गर्दीबाबत प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी- मुख्यमंत्री
वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे झालेल्या गर्दीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. कोविडच्या काळात अशा रीतीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितांवर जिल्हा व पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. तसेच वाशिम जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना याचा अहवाल देण्यास सांगण्याच्या सूचना मुख्य सचिवांना दिल्या आहेत. मात्र संजय राठोड यांच्यावर अजूनही कोणती कारवाई करण्यात आलेली नाही.
पूजा चव्हाण प्रकरणात मला गोवण्याच प्रयत्न- राठोड
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्यानंतर तब्बल पंधरा दिवसानंतर संजय राठोड सर्वांसमोर आले. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात विरोधकांकडून राठोड यांना जबाबदार धरले जात आहे. मात्र, आपले या प्रकरणाशी काही घेणदेणं नसून केवळ राजकीय स्वार्थापोटी आपल्याला यात गोवण्यात आले आहे. असे स्पष्टीकरण संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे दिले आहे.