मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक तब्बल दीड वर्षानंतर तुरुंगातून बाहेर आले आहेत. मलिक यांना गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते आर्थर रोड कारागृहात होते.
माध्यमांशी बोलण्यास परवानगी नाही : मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय कारणास्तव दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर ते सोमवारी तुरुंगातून बाहेर आले. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांसह समर्थकांनी कुर्ला येथील क्रिटीकेअर रुग्णालयाबाहेर एकच जल्लोष केला. नवाब मलिक यांना सहा अटींसह जामीन मिळाला आहे. मात्र त्यांना माध्यमांशी बोलण्यास परवानगी नसल्याने ते पत्रकार परिषद घेण्याची शक्यता कमी आहे.
गेल्या वर्षी ईडीने अटक केली होती : नवाब मलिक यांच्यावर कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर आणि त्याच्या इतर हस्तकाशी ३०० कोटी मालमत्तेचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. ते सध्या सीटी केअर रुग्णालयात किडनीच्या आजारावर उपचार घेत आहेत. प्रकृती ढासळल्यानंतर मलिक यांनी जामिनीसाठी कोर्टात अर्ज केला होता. मात्र, त्यावेळी ईडीने त्याला विरोध केला. त्यानंतर त्यांनी पुन्हा जामिनासाठी अर्ज दाखल केला. तेव्हा मात्र ईडीने विरोध केला नाही. त्यानंतर कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला. नवाब मलिक यांना २३ फेब्रुवारी २०२२ रोजी ईडीने अटक केली होती. त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. दरम्यान, अजित पवार यांच्या बंडानंतर मलिक यांच्या सुटकेच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. आता त्यांना तब्बल दीड वर्षानंतर जामीन मंजूर झाला आहे.
स्वागतासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी : नवाब मलिक क्रिटीकेअर रुग्णालयातून कुर्ला येथील नूर मंजिल येथे आपल्या निवासस्थानी गेले. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी त्यांचे कुटुंब व अनेक कार्यकर्ते जमले होते. त्यांनी आपल्या कारच्या सनरूफमधून कार्यकर्त्यांचे अभिवादन स्वीकारले. नवाब मलिकांच्या वकिलांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पार केल्यानंतर ते क्रिटीकेअर रुग्णालयातून बाहेर आले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.
हेही वाचा :