पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंड पुकारत शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. आता शरद पवार गटातील एक बडा नेता अजित पवार यांच्यासोबत जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज सकाळी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भाजपचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. राजकीय चर्चा सुरू असताना जयंत पाटील हे आज ३ वाजता सविस्तर बोलणार आहेत. यावेळी ते काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे.
देशाचे गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटील यांना फोन करून बोलवून घेतले. त्यानंतर आज सकाळी त्यांच्यात आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यामध्ये भेट झाल्याची सांगितले जात आहे. जयंत पाटील भाजपसोबत जाण्याच्या तयारीत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यांच्या सोबत सुमन पाटील व प्राजक्त तनपुरे हे देखील सोबत जाणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच ही भेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घडवून आणली असल्याचेदेखील सांगितले जात आहे. जयंत पाटील यांनी सिल्व्हर ओकवर शरद पवार यांचीदेखील भेट घेतली आहे. शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर जयंत पाटील यांच्या डोळ्यात पाणी आले होते. दुसरीकडे अजित पवार यांच्या बंडानंतर त्यांनी नव्याने पक्षाला बळकट देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले होते.
अमित शाह यांच्या दौऱ्यातदेखील बदल- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काल शनिवारी संध्याकाळी पुणे शहरात दाखल झाले. त्यानंतर ते दोन दिवस पुणे दौऱ्यावर होते. शनिवार अन् रविवारी पूर्ण दिवस अमित शाह यांचा मुक्काम पुणे शहरात होता. मात्र शहा यांच्या दौऱ्यामध्ये अचानक बदल करण्यात आला आहे. शाह हे सहकार विभागाचा कार्यक्रम संपल्यानंतर दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती मिळत आहे. कार्यक्रमानंतर होणाऱ्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. सहकार विभागाचा कार्यक्रम आटपून शाह हे तीन वाजता पुणे विमानतळावरून दिल्लीकडे रवाना होणार आहेत. शाह यांच्या कार्यक्रमातील बदलाचे अद्याप कारण समोर आले नाही.
हेही वाचा-