मुंबई - मनी लॉड्रिंग प्रकरणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ईडीने तब्बल साडेनऊ तास चौकशी केली आहे. सोमवारी सकाळी जयंत पाटील हे मुंबईतील ईडी कार्यालयात दाखल झाले होते. त्यानंतर तब्बल साडेनऊ तासांनी म्हणजे सोमवारी रात्री साडेनऊ वाजता जयंत पाटील ईडी कार्यालयाबाहेर आले. यावेळी राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते ईडी कार्यालयाबाहेर हजर होते.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली आहेत. मला वाटत नाही की त्यांच्याकडे आता काही प्रश्न उरले असतील - जयंत पाटील - प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
समाधानकारक उत्तरे दिली - राज्याच्या कानाकोपऱ्यातून समर्थनासाठी आलेल्या कार्यकर्त्यांचे जयंत पाटील यांनी आभार मानले आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली आहेत. मला वाटत नाही की त्यांच्याकडे आता काही प्रश्न उरले असतील. तुम्ही सकाळपासून ईडी आणि पक्ष कार्यालयाबाहेर थांबून सगळ्यांनी माझ्यावरती जे प्रेम दाखवलेत त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी ईडी चौकशीनंतर दिली आहे.
भाजपाविरोधात घोषणाबाजी : सोमवारी सकाळपासूनच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ईडीच्या कार्यालयाबाहेर जमा झाले होते. ईडीच्या कार्यालयाबाहेरच कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले होते. राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विरोधातही या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ईडी आणि भाजपाविरोधातही कार्यकर्त्यांचा आक्रोश पाहायला मिळाला. तर ईडीकडून सुडबुद्धीने कारवाई केली जात असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. ईडी भाजपच्या घरगडी प्रमाणे काम करत असल्याचा आरोपही अनेकांनी केला.
काय आहे प्रकरण? - जयंत पाटील यांच्यावर आयएल अँड एफएस कंपनीशी संबंधित गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप आहे. 2008 ते 2014 या कालावधीत रस्ते उभारणीच कॉन्ट्रॅक्ट संबंधित कंपनीला देण्यात आलं होते. संबंधित कंपनीकडून सब कॉन्ट्रॅक्टरला कंत्राट देण्यात आले. सब कॉन्ट्रॅक्टरने कथितरित्या जयंत पाटील यांच्याशी निगडित कंपन्यांना पैसे दिल्याचा आरोप आहे. हे पैसे देण्यात आले त्यावेळीं जयंत पाटील राज्याचे गृहमंत्री होते. IL&FS कंपनीवर 91 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. अनेक प्रकल्प अपूर्णावस्थेत असल्यामुळे त्यांच्याकडे पैसा नाही.
हेही वाचा -