मुंबई - मलाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटते,अशी सुप्त इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली होती. त्यावरून राजकीय तर्क वितर्कांना उधान येताच जयंत पाटील यांनी सारवा सारव करत माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
तसेच दीर्घकाळ राजकारणात काम करणाऱ्या कुणालाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटू शकते, मलाही तसे वाटणे स्वाभाविक आहे, पण शरद पवारांचा निर्णय हा आमच्या दृष्टीने अंतिम आहे, असे मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले होते. ते सांगलीच्या इस्लामपूर मध्ये मुलाखती दरम्यान बोलत होते. त्यानंतर मात्र त्यांनी त्यांच्या माझ्या वक्तव्यांचा प्रसार माध्यमांकडून विपर्यास केला गेल्याचे मत व्यक्त केले आहे.
मी असं म्हंटलच नाही -
राजकीय वर्तुळातील चर्चा पाहता मी असे म्हंटलच नसल्याचे सांगत जयंत पाटील यांनी यूटर्न घेतला आहे. मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? असा प्रश्न मला विचारण्यात आला होता. त्यावर मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करत संबंधित वाहिनेने वृत्त दाखवले, असे स्पष्टीकरण जयंत पाटील यांच्याकडून देण्यात आले. तसेच आमच्याकडे संख्याबळ ही कमी आहे शिवाय राष्ट्रवादीत कोणताही निर्णय केवळ शरद पवार हेच घेत असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
काय वाटतंय याने काहीही होत नाही -
तर तिथेच महाविकास आघाडी ही एक दिलाने काम करत आहे. कोणाला काय वाटतंय याने काहीही होत नाही, असा चिमटा शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी काढला. जयंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची ओढाताण सुरू होणार का? अशा चर्चा मात्र सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री पदाच्या चढाओढीतून महाराष्ट्रात कधी नव्हे ते विभिन्न विचारसरणीचे लोक एकत्र येत सरकार स्थापन झाले असल्याचेही सावंत म्हणाले.