मुंबई - गेल्या ५ वर्षांत सरकारने धनगर बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही. त्यासंबधी काहीच केले नाही. उलट आता निवडणुकीच्या तोंडावर १ हजार कोटींचं गाजर दाखवत त्यांना पुन्हा आरक्षणापासून वंचित ठेवल्याचे म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी सरकारवर निशाणा साधला.
धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्दयावरुन धनंजय मुंडे सभागृहात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी भाजप-शिसेनेच्या सरकारने गेल्या ५ वर्षात काहीच केले नसल्याचे मुंडे म्हणाले. धनगर समाज हे खपवून घेणार नसल्याचेही मुंडे म्हणाले. आता निवडणुकांच्या तोंडावर सरकारने धनगर समाजाला १ हजार कोटींचे गाजर दाखवले असल्याचे म्हणत त्यांनी भाजपला लक्ष्य केले.
एकही स्मारक पूर्ण नसताना अटल बिहारी वाजपेयींच्या स्मारकाची घोषणा
अद्यापही दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक अस्तित्वात आलेले नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासंदर्भात अनेक आक्षेप आहेत. राज्यात एकही स्मारक उभे राहत नसताना, दिवंगत अटल बिहारी वाजपेयींच्या स्मारकाची घोषणा करण्यात आली आहे. हे स्मारक तरी पूर्णत्वाला जाणार का? याबाबत शंका वाटत असल्याचे धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.
मुंबईच्या अरबी समुद्रातले छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक झाले नाही. सरदार पटेल यांच्या पुतळ्यापेक्षा शिवरायांचा पुतळा उंच असेल, असे आश्वासन सरकारने दिले होते. त्याचे काय झाले? उलट, शिवरायांच्या स्मारकाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप खुद्द, स्मारकाच्या अध्यक्षांनी केला असल्याचे मुंडे यावेळी म्हणाले.