मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराचे पेव फुटले आहे. काही केल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती थांबण्यास तयार नाही. आज गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित त्यांनी मातोश्रीवर त्यांनी आज घड्याळ काढून शिवबंधन बांधले.
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरचे भास्कर जाधव यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचा हा सेना प्रवेश म्हणजे कोकणात राष्ट्रवादीला जोरदार धक्का आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचे विश्वासू सहकारी म्हणून भास्कर जाधवांची ओळख होती. गेल्या अनेक दिवसांपासून जाधव शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. अखेर या सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
मूळ स्वभाव स्वस्त बसू देत नव्हता म्हणून शिवसेना प्रवेश
मी राष्ट्रवादीशी माझे कोणतेही भांडण नाही. मी मूळचा शिवसैनिक आहे. त्यामुळे माझा मूळ स्वभाव मला स्वस्त बसू देत नव्हता. त्यामुळे मी शिवसेनेत प्रवेश केल्याचे भास्कर जाधवांनी सांगितले. मला माझी अंतरात्मा शांत बसू देत नव्हता. उद्धव ठाकरेंनी अंतरात्मा ओळखला.
मिलिंद नार्वेकरांवर कधीही टीका केली नाही
मिलिंद नार्वेकर यांच्यामुळे शिवसेना सोडली असा मी कधीही आरोप केला नसल्याचे भास्कर जाधव म्हणाले. तसेच कधीच मिलिंद नार्वेकर यांच्यावरही टीका केली नसल्याचे ते म्हणाले.