मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबद्दल केलेल्या विधानानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये अस्वस्थता माजली होती. यानंतर आज (शनिवारी) राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. शरद पवार यांनी जे काही बोलले असतील, ते वडिलधाऱ्यांनी दिलेल्या सल्ला म्हणून घ्यावा, असे ते म्हणाले आहेत. देशाचे नेतृत्व करण्यासाठी राहुल गांधी यांच्याकडे सातत्याची कमतरता असल्याचे मत शरद पवार यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केले होते.
पवारांच्या वक्तव्याला यशोमती ठाकूरांचे प्रत्युत्तर -
महाविकास आघाडीतील पक्षाच्या सदस्यांना राज्यात सर स्थिर सरकार हवे असेल तर त्यांनी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाबाबत वक्तव्य करणे बंद करावे, असे महिला बालकल्याण मंत्री आणि काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांनी शरद पवारांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले. त्या म्हणाल्या, आमचे नेतृत्व स्थिर आणि शक्तिशाली आहे. महाविकास आघाडीची स्थापना हे त्याच लोकशाही मुल्यांमध्ये असलेला विश्वासाचे उदाहरण आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारी अध्यक्ष असल्याच्या नात्याने मी महाविकास आघाडीच्या सहकाऱ्यांना आवाहन करते, राज्यात जर तुम्हाला स्थिर सरकार हवे असेल तर त्यांना काँग्रेस नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे बंद करावे. प्रत्येकाने आघाडीचा मूलभूत नियम पाळावा, असेही ते म्हणाल्या होत्या.
हेही वाचा - 'महाराष्ट्र आणि राजस्थानातील सरकार पाडण्यासाठी भाजपा प्रयत्नशील'
प्रत्येकाचा दृष्टीकोण विचारात घेण्याची गरज नाही -
अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांचे 'ए प्रॉमिस्ड लँड' हे 768 पानांचे पुस्तक 17 नोव्हेंबरला प्रकाशित होत आहे. या पुस्तकामध्ये त्यांनी राहुल गांधी, डॉ. मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा उल्लेख केला आहे. 'राहुल गांधी एका विद्यार्थ्याप्रमाणे आहेत. ज्याने संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यांना आपल्या शिक्षकाला प्रभावितही करायचे आहे. मात्र, त्या विषयात प्रभुत्व मिळण्यासाठी त्यांच्याकडे योग्यता नाही किंवा त्यांच्यात तेवढी उत्कटता नाही', असे वर्णन ओबामांनी राहुल गांधींचे केले आहे. याबाबत शरद पवार यांचे मत विचारले असता, एखाद्या व्यक्तीबाबत प्रत्येकाचा दृष्टीकोण विचारात घेण्याची गरज नाही, असे पवार म्हणाले.
गांधी कुटुंबाविषयी आजही आदर -
आपण दुसऱ्या कुठल्याही राष्ट्रातील नेतृत्वाबाबत बोलू शकत नाहीत. मात्र, आपल्या देशातील नेतृत्वाबाबत नक्कीच बोलू शकतो. माझ्या मते ओबामांनी राहुल गांधी यांच्याबाबत टिप्पणी करून ही मर्यादा ओलांडली आहे, असे शरद पवार म्हणाले. एखाद्या पक्षाचे नेतृत्व करणे ही बाब त्या पक्षातील लोकांमध्ये आपल्या नेत्याबाबत काय भावना आहे, यावर अवलंबून आहे. माझे सोनिया गांधी आणि गांधी परिवाराशी काही वैचारिक मतभेद निश्चत आहेत. मात्र, मी ठामपणे सांगू शकतो आजही काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात गांधी आणि नेहरू कुटुंबाबाबत नितांत आदर आहे, असेही पवार म्हणाले.