मुंबई - विधानपरिषदेच्या पदवीधर निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने औरंगाबाद आणि पुणे पदवीधर मतदारसंघातून आपल्या दोन उमेदवारांची नावे आज घोषित केली आहेत. या दोन्ही मतदारसंघात राष्ट्रवादी भाजपला तगडे आव्हान देणार आहे. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीने पुन्हा एकदा विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. तर पुण्यातून उद्योगपती अरुण लाड यांच्या नावाची घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.
औरंगाबाद पदवीधर मतदार संघ मागील काही निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीने आपल्याकडे राखून ठेवला आहे. यावेळीही विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांनाच राष्ट्रवादीने संधी दिली आहे. तर भाजपकडून यावेळी औरंगाबादेतून शिरीष बोरालकर यांना मैदानात उतरवले आहे. औरंगाबाद शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात मागील अनेक निवडणुकांमध्ये भाजपला अंतर्गत विरोधामुळे अपयशाला सामोरे जावे लागते. यावेळी भाजपने बोरकर यांना उमेदवारी दिली असली तरी भाजप पुरस्कृत असलेल्या अनेक प्राध्यापक संघटनांची त्यावर नाराजी आहे. विशेष म्हणजे भाजपचा कणा असलेल्या शिक्षक परिषदेमध्येही दुफळी निर्माण झाली असल्याने भाजपला याचा फटका बसणार आहे.
हेही वाचा - ...तर मी भाजपमध्ये प्रवेश करणार, नगरमध्ये मंत्री बच्चू कडूंचे खळबळजनक वक्तव्य
भाजपा उमेदवाराला फटका बसण्याची शक्यता -
पुणे पदवीधर मतदारसंघातून मागील वेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री चंद्रकांत पाटील हे निवडून आले होते. परंतु त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान कोथरूड येथून विधानसभेसाठी उभे राहून ती निवडणूक जिंकली होती. यामुळे पुणे पदवीधर मतदारसंघातील ही जागा रिकामी झाली होती. चंद्रकांत पाटील हे भाजप अध्यक्ष असले तरी मागील पाच वर्षात पुणे पदवीधर मतदारसंघांमध्ये त्यांचे कोणतेही भरीव काम समोर आले नाही. दुसरीकडे मागील काळात भाजप सरकार असताना उच्च शिक्षण विभागातील अनेक प्रश्न प्रलंबित राहिल्याने भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांना फटका बसू शकतो, अशी शक्यताही वर्तवली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे पदवीधर मतदारसंघातून अरुण लाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, लाड यांना पुण्यातून ज्येष्ठ विचारवंत व इतिहासकार श्रीमंत कोकाटे यांचे आव्हान मिळणार आहे. मागील अनेक महिन्यांपासून कोकाटे यांनी राष्ट्रवादीतून उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न केला होता, परंतु ऐनवेळी त्यांना डावलले गेले.
हेही वाचा - 'कुटुंब केंद्रीत असलेले पक्ष लोकशाहीसाठी सर्वात मोठा धोका'