मुंबई- राज्यातील प्रमुख शहरांमधील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व खाजगी आस्थापना, दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेसने आपले मुंबई विभागाचे कार्यालय 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिली आहे.
मागील काही दिवसांत करोना बाधित रुग्णांची संख्या मुंबईत झपाट्याने वाढत असून या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने हा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे उद्यापासून मुंबईमध्ये लोकल प्रवासासाठी अनेक प्रकारचे निर्बंध घालण्यात आले आहेत. यामुळे शासकीय आदेशाचे पालन करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे राष्ट्रवादीने सांगितले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई कार्यालया संदर्भात घेण्यात आलेल्या निर्णयानंतर पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नागरिकांना मदत करावी. जे निराधार, निराश्रित ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना अशावेळी मदतीचा हात द्यावा, कार्यकत्यांनी स्वतः दक्ष राहावे, स्वतःची काळजी घ्यावी, इतरांना मदतीचा हात द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.