मुंबई - शरद पवार यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे. या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे काही नवीन चेहरे समोर आले आहेत. यात आमदार रोहित पवार, आमदार संदीप क्षीरसागर, राष्ट्रवादीच्या युवती महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया दुहान, तसेच आमदार संग्राम जगताप हे नवीन यंग चेहरे या पत्रकार परिषदेत शरद पवार यांच्या मागे बसलेले दिसून आले आहेत.
शरद पवारांसोबत दिसली यंग ब्रिगेड : शरद पवारांच्या आजच्या पत्रकार परिषदेत आमदार रोहित पवार, आमदार संदीप क्षीरसागर, संग्राम जगताप, संजय बनसोडे तसेच सोनिया दूहान या त्यांच्या मागे बसल्याचे पाहायला मिळाले. आतापर्यंत जेव्हा जेव्हा शरद पवार यांची पत्रकार परिषद झाली त्यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील अनेक ज्येष्ठ नेते बसलेले दिसायचे. यात छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील अशी अनेक नाव आहेत. मात्र, यावेळी या ज्येष्ठ नेत्यांमध्ये फक्त जयंत पाटील व प्रफुल्ल पटेल शरद पवार यांच्यासोबत पत्रकार परिषदेला होते. अजित पवार मात्र या पत्रकार परिषदेला गैरहजर होते. त्यामुळेच शरद पवार हे तरुणांना पुढे करून कोणता संदेश देऊ इच्छितात का? हा प्रश्न उद्भवतो.
- रोहित पवार - आजच्या पत्रकार परिषदेत रोहित पवार शरद पवारांच्या अगदी मागे बसले होते. रोहित पवार हे शरद पवारांचे नातू आहेत. तसेच ते कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. 34 वर्षीय रोहित पवार यांची ओळख आक्रमक मात्र मृदुभाषी तरुण नेता अशी आहे. रोहित पवार यांनी मुंबई विद्यापीठातून बिजनेस मॅनेजमेंटची पदवी घेतली आहे. शरद पवार यांच्या नंतर राजकारणात येणारे ते पवार कुटुंबातील पाचवे सदस्य आहेत. राष्ट्रवादीसोबतच पवार कुटुंबात देखील फूट पडते की काय? अशा चर्चा असतानाच रोहित पवार मात्र आपल्या आजोबांसोबत ठामपणे उभे असल्याचं दिसून येत आहे.
- सोनिया दुहान - या पत्रकार परिषदेत दिसून आलेले आणखी एक तरुण नेतृत्व म्हणजे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहान. सोनिया या आज ज्या समितीने शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर केला त्या समितीच्या देखील सदस्या आहेत. या समितीने आज एकमताने ठराव मंजूर करून पवार यांना हा निर्णय मागे घेण्याची विनंती केली. सोनिया दुहान यांची खास ओळख म्हणजे त्यांनी 2019 मध्ये हरियाणातील गुरुग्राममधून राष्ट्रवादीच्या आमदारांची सुटका करून अजित पवार यांच्या गटाचे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापनेचे भाजपचे प्रयत्न हाणून पाडले होते. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार अडचणीत असताना त्यांनी पुन्हा कमांड हाती घेत बंडखोर आमदारांचा सुरतपासून गुवाहाटी आणि नंतर गोव्यापर्यंत पाठलाग केला होता.
- संदीप क्षीरसागर - बीडचे राजकारण जसे मुंडे कुटुंबीयासभोवती फिरते तसेच ते क्षीरसागर कुटुंबाभोवती देखील फिरतं. क्षीरसागर कुटुंबीय सुरुवातीपासून काँग्रेस पक्षात होते. मात्र, 2019 च्या निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला आणि शिवसेनेत प्रवेश केला. त्याच वेळी बीडमधून राष्ट्रवादीने त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत संदीप क्षीरसागर यांनी काकांवर मात करत विजय मिळवला होता. आज संदीप क्षीरसागर यांचा समावेश शरद पवारांच्या जवळच्या व्यक्तींमध्ये असून पक्ष अडचणीत असताना ते शरद पवारांच्या मागे ठामपणे उभे असल्याचं दिसून येतं.
- संग्राम जगताप - नगरचे राजकारणातील एक मोठं नाव म्हणजे संग्राम जगताप. संग्राम जगताप हे सध्या महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार असून त्यांचे वडील देखील यापूर्वी विधान परिषदेत आमदार होते. संग्राम जगताप हे अजित पवार यांच्या जवळचे मानले जातात. मात्र राष्ट्रवादीतील सध्याच्या घडामोडी पाहता संग्राम जगताप हे शरद पवारांचं सोबत असल्याचं दिसून येत आहे.
- संजय बनसोडे - या यादीतील शेवटचं नाव म्हणजे संजय बनसोडे. संजय बनसोडे हे सध्या आमदार असून महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम पाहिलेलं आहे. लातूरच्या उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेले संजय बनसोडे हे एकेकाळी अजित पवार यांच्या गटाचे मानले जायचे. 2019 साली ज्यावेळी अजित पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापनेच्या तयारीत होते त्यावेळी राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांमध्ये संजय बनसोडे यांचे देखील नाव होते.
शरद पवारांसंदर्भातल्या सर्व बातम्या वाचा - |