मुंबई - पेट्रोल-डिझेल दरात सातत्याने वाढ होत आहे. या विरोधात केंद्र सरकारच्या निषेधार्थ राज्यातील पेट्रोल पंपांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने चूल मांडा आंदोलन केले जाणार आहे. उद्या सकाळी ११ वाजता या आंदोलनाला सुरुवात होईल, अशी माहिती महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली.
हेही वाचा - तृतीयपंथीयांच्या गुरूची हत्या; आरोपींना अटक
दगड-विटांची चूल
दिवसेंदिवस गॅस आणि पेट्रोल-डिझेलचे भाव वाढत आहे. 'अच्छे दिन'च्या नावाखाली मोदी सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे, लोकांच्या उद्रेकाला वाट मोकळी करून देण्यासाठी राज्यातील ज्या पेट्रोलपंपांवर मोदींचा बॅनर किंवा जाहिरात असेल, त्या ठिकाणी दगड-विटांची चूल मांडून प्रतिकात्मक आंदोलन केले जाईल, असे चाकणकर यांनी सांगितले. तसेच, राज्यातील महिला कार्यकर्त्या आणि गृहिणी मोठ्या संख्येने आंदोलनात सामील होणार असल्याचे देखील चाकणकर यांनी सांगितले.
कोरोनाचे नियम पाळा
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मास्क घालून आणि शारीरिक अंतर ठेवून हे आंदोलन केले जाईल. राज्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शासनाच्या सूचनांचे पालन करून आंदोलन करावे, असे आवाहन चाकणकर यांनी केले. या आंदोलनात महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर या पुण्यातून सहभागी होणार आहेत. आंदोलनात अधिकाधिक महिला कार्यकर्त्या, तसेच सर्वसामान्य गृहिणी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून सहभागी होणार आहेत, असे चाकणकर यांनी सांगितले.
हेही वाचा - अखेर जीवघेण्या संघर्षावर विजय मिळवून 'तिरा' आता घरी जाणार!