मुंबई - नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून अटक करण्यात आलेल्या अब्दुल बासित परिहार (23) या आरोपीला किल्ला न्यायालयात हजर केले असता त्याला ९ सप्टेंबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर त्याला एनसीबीच्या कार्यालयात नेण्यात आले असून त्याठिकाणी त्याची चौकशी सुरू आहे.
बुधवारी पहाटे एनसीबीने वांद्रे येथून अब्दुल बासित परिहारला अटक केली होती. अब्दुल बासितचा थेट संबंध रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती याच्याशी असल्याचे सांगितले जात आहे. शोविकने अब्दुल बासितकडून ड्रग्स घेतले होते. यापूर्वी मंगळवारी एनसीबीने जैद विलिंत्र नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले होते. अब्दुल बासित यांनी जैद आणि शोविक यांची ओळख करून दिली. अब्दुल बासित परिहार आणि सूर्यदीप मल्होत्रा यांच्याशीही ड्रग्स संबंधित गप्पा झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
17 मार्च 2020 रोजी झालेल्या गप्पांमध्ये शोविकने जैदने विलिंत्राचा संपर्क क्रमांक सॅम्युअल मिरांडाला दिला आणि 5 ग्रॅम ड्रग्स खरेदी करण्यासाठी जैदला 10 कोटी रुपये देण्यास सॅमुअलला सांगितले. त्यानंतर जैद सॅम्युअल मिरांडाजवळ आला. सॅम्युअल मिरांडाने जैदला तीन वेळा फोन केला होता. अब्दुल बासितने सॅम्युअल मिरांडा आणि जैदची भेट घालून दिली होती. त्यानंतर जैदने सॅम्युअल मिरांडाला थेट ड्रग्स पुरवठा सुरू केला. सॅम्युअल मिरांडाने अनेकदा जैदकडून ड्रग्स गोळा करण्यासाठी आपला वेगळा स्टाफ पाठवला आणि बर्याच वेळा त्याला स्वतः जैदकडूनही ड्रग्स मिळाले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून न्यायालयाला सांगण्यात आले होते की, सदरचा आरोपी हा वेगवेगळ्या व्यक्तींना भेटत होता व त्यांच्याशी व्हाट्सअॅपवर संपर्कात होता. या दरम्यान या आरोपीने कोण कोणत्या गोष्टींना कुठल्या अंमली पदार्थांचा पुरवठा केला आहे? याचा तपास करण्यासाठी आरोपीच्या एनसीबी कोठडीची गरज असल्याचे न्यायालयात सांगितले होते. मात्र, बचाव पक्षाचे वकील तारक सय्यद यांनी यासंदर्भात युक्तिवाद करताना म्हटलं होतं की, एनसीबीकडून हस्तगत करण्यात आलेले अंमली पदार्थ हे खूपच अल्प प्रमाणात असून सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी अटक आरोपीवर जोर जबरदस्ती करून त्याच्याकडून स्टेटमेंट लिहून घेतल्याचा आरोप केला आहे. न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर अटक आरोपीला 9 सप्टेंबर पर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे.
याप्रकरणी एनसीबीकडून आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आलेली असून यामध्ये जैद विलिंत्र, फैजाण व बासित या आरोपींचा समावेश आहे. शोविक आणि सॅम्युअल मिरांडा आणि अब्दुल बासित यांची चौकशी सुरू आहे.