मुंबई - उदयनराजे भोसलेंना आता भाजपसमोर लोटांगण घातल्याशिवाय पर्याय नाही. मोदी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची पुस्तकात तुलना केल्याप्रकरणी उदयनराजेंनी प्रतिक्रिया दिली नाही. यातून त्यांनी लाचारी काय आहे, हे दाखवून दिले, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी केली.
उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसवर 'जाणता राजा' या शब्दावरून टीका केली होती. त्याला नवाब मलिकांनी प्रत्युउत्तर दिले. जाणता राजा हा शब्द पवारसाहेबांनी लिहिला नाही. 'जाणता राजा' याचा अर्थ आहे की, ज्याला सर्व विषयांची जाण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने चुकीच्या अर्थाने या शब्दाचा कधी वापर केला नाही. याउलट आदित्यनाथ आणि जयभगवान गोयल यांनी मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांशी उघडपणे तुलना केली. त्यावर उदयनराजे काही बोलले नाहीत, याकडे नवाब मलिक यांनी लक्ष वेधले.
हेही वाचा - शिवसेना नाव बदलून ठाकरेसेना करा'
गोयल नावाच्या माणसाकडून मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यासह देशात विरोधाचे वातावरण निर्माण झाले. सोमवारी रात्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेवून सांगितले की, त्या लेखकाने माफी मागून पुस्तक मागे घेतले आहे. मात्र, आमची माहिती अशी आहे की, ते लेखक पुस्तक मागे घ्यायला तयार नाहीत, माफी मागायला तयार नाही. त्यामुळे भाजपच्या कार्यालयात जावडेकर आणि गोयल यांनी एकत्र बसून पत्रकार परिषद घ्यायला हवी आणि गोयल यांनी जाहीर माफी मागून पुस्तक मागे घेत आहे, असे जाहीर करावे अशी स्पष्ट मागणीही नवाब मलिक यांनी केली.