हैदराबाद - नवरात्रोत्सव सुरू झालेला आहे. या विशेष पर्वावर 'ईटीव्ही भारत'ने 'महाराष्ट्राच्या नवदुर्गा' ही विशेष मालिका सुरू केली आहे. या मालिकेत आपण दररोज विविध क्षेत्रातील नामवंत, कर्तृत्ववान महिलांशी गप्पा करतोय. आज आपण भारतीय महिला नेमबाज राही सरनोबत हिच्याशी संवाद साधणार आहोत. राहीने 2008 मध्ये पुण्यात झालेल्या कॉमनवेल्थ यूथ खेळामध्ये पहिले सुवर्ण पदक जिंकले. तिला 2018 साली अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच नुकत्याच झालेल्या टोक्यो ऑलम्पिक स्पर्धेत देखील राहीने सहभाग घेतला होता.
प्रश्न - राही, तू टोक्यो ऑलम्पिकमध्ये सहभागी झाली होती. तेथील काय अनुभव सांगशील?
उत्तर - यावर्षीची ऑल्मपिक स्पर्धा खूप वेगळ्या परिस्थिती पार पडली. स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. कोरोनाच्या सावटाखाली ही स्पर्धा पार पडली. मात्र आमची चांगली काळजी घेतली गेली. कोरोनाचे नियम पाळण्यात आले. दररोज कोरोना चाचणी होत होती. अनेक सोयीसुविधा करण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे हा खूपचं वेगळ्या पद्धतीचा अनुभव होता.
प्रश्न - कोल्हापुरात तुझं शिक्षण झालं. त्यानंतर नेमबाजीत प्राविण्य मिळवलं. नेमकं तू नेमबाजी हाच खेळाचा प्रकार कसा निवडला? त्यामध्ये तुला आवड कशी निर्माण झाली? आपण याच खेळात करियर करावं, असं केव्हा वाटलं?
उत्तर - मला एनसीसीमध्ये बंदूकीची ओळख झाली. त्याठिकाणी पहिल्यांदाच मी बंदुक चालवली. मी चांगली नेमबाजी करीत होते. त्यामुळे नेमबाजी पुढेही चालू ठेवण्याचा मी निर्णय घेतला. तेजस्विनी सावंत यांनी पदक जिंकलं होतं. त्यामुळे त्या माझा आदर्श बनल्या. माझ्या प्रशिक्षकांनी देखील माझ्या आई-वडिलांना प्रोत्साहित केले आणि त्यानंतर मी नेमबाजीचा सराव करु लागले.
प्रश्न - तुला घरच्यांचे सहकार्य कसे मिळाले?
उत्तर - सुरुवातीला घरच्यांचे मत वेगळे होते. त्यांना मला शिक्षणात घडवायचे होते. परंतु माझी आवड बघून त्यांनी मला पाठिंबा दिला. नेमबाजीसाठी पाठिंबा मिळवण्यास मला जास्त त्रास झाला नाही. घरच्यांनी मला सर्वोतोपरी सहकार्य केले.
हेही वाचा - महाराष्ट्राच्या नवदुर्गा : नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने पार्श्वगायिका वैशाली माडेंची विशेष मुलाखत
प्रश्न - खेळासाठी खूप सरावं करणे गरजेचा असते. नेहमी तुम्ही त्यात व्यस्त असता. यामध्ये मग शाळेचा अभ्यास मागे पडतो. सराव, शाळा आणि अभ्यास हे तु कसं मॅनेज केलं?
उत्तर - माझं सकाळी कॉलेज असायचं. आणि प्रक्टिस पण. त्यामुळे सकाळचे दोन तास कॉलेज बुडायचं. मात्र, मैत्रिणींकडून मी नोट्स घेऊन अभ्यास करायचे. परंतू कॉलेज देखील दररोज करायचे. अभ्यासात मी दुर्लक्ष केले नाही. कोणतीही परीक्षा चुकवली नाही आणि नापासही झाले नाही. शिक्षणाचा ध्यासही होता आणि खेळाचाही सराव सुरू होता. मला शिवाजी विद्यापीठाचे विशेष सहकार्य मिळाले. माझ्या सोयीनुसार पेपर घेत होते आणि निकालही लावत होते.
प्रश्न - कोल्हापुरात सरावाची साधनं पुरेशी होती काय? तुला सरावासाठी कोणकोणती साधनं मिळाली? यासाठी तुला काय धडपड करावी लागली?
उत्तर - पुरेशी साधन तर उपलब्ध नव्हते. परंतु आमच्या प्रशिक्षकांनी आत्मविश्वास दिला. त्यामुळे आम्ही साधनांशिवाय यश मिळवू शकलो. 25 मीटर नेमबाजीची कोल्हापुरात रेंज नसल्याने मला मुंबईला जाऊन सराव करावा लागला. 25 मीटर या प्रकारातील सराव करण्यासाठी मला मुंबईल जावं लागलं.
प्रश्न - आपल्या देशात अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत. मात्र, आपण आजही ऑलम्पिकमध्ये फार कमी पदकं मिळवतो. ही परिस्थिती सुधारण्यासाठी काय करणे गरजेचे आहे. तुला काय वाटतं?
उत्तर - आजच्या परिस्थितीनुसार, देशाची आर्थिक स्थिती चांगली आहे. मात्र नियोजनात सुधार करू शकतो. काही बाबींसाठी इतर राज्याची मदत घेऊ शकतो. प्रत्येक राज्याचा एक प्रवास असतो. आपल्या देशाची आता सुरुवात झाली आहे. इतर देशांचा मोठा इतिहास आहे. आपल्याकडे देखील अनेक प्रतिभावान खेळाडू आहे. आपल्याला अजूनही अभ्यासाची, अनुभवाची आणि विज्ञानाची आवश्यकता आहे. हळूहळू परिस्थिती सुधारेल.
प्रश्न - नवरात्रिच्या निमित्ताने एक खेळाडू म्हणून तू नवोदित खेळाडू आणि महिला, मुली यांना काय संदेश देशील?
उत्तर - जेव्हा आपण क्रिडा क्षेत्र निवडतो तेव्हा आपल्याला जोखीम पत्करावी लागते. आपण दीर्घकालीन विचार ठेवावा. त्यासाठी शारिरीक, भावनिक आणि मानसिक गुंतवणूक ठेवावी लागेल. खेळ हा आयुष्याचा भाग नाही तर आयुष्यच खेळाचं वेळापत्रक बनवलं पाहिजे. मी मनापासून सांगते की, खेळ हा खूप काही शिकवते. खेळाडू हा आपल्या आयुष्यातील प्रश्न खंबीरपणे सोडवतात. पैसा आणि प्रसिद्धीपेक्षा आयुष्य जगण्यासाठी खेळ आपल्याला शिकवते.