मुंबई - नवी मुंबईच्या कोविड टेस्टिंग केंद्रात 10 वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीचा अहवाल देऊन शासनाकडून पैसे लाटण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली होती. याप्रकरणी मनपाचा एक आरोग्य अधिकारी व टेंस्टिंग इंचार्जला निलंबित करण्यात आले आहे.
कोरोना केंद्राच्या सोयी सुविधांवर नागरिक ताशेरे ओढत आहेत. त्यात नवी मुंबईतील कोविड टेस्टिंगमधील घोटाळ्याची आणखी भर पडली आहे. नवी मुंबईच्या कोविड टेस्टिंग केंद्रात 10 वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीचा अहवाल देऊन शासनाकडून पैसे लाटण्यात आले. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेऊन चौकशी करण्याची मागणी केली होती. आयुक्त बांगर यांनी याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार डॉ. योगेश कडूसकर यांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय समिती नेमण्यात आली होती.
चौकशीअंती मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. सचिन नेमाने यांना निलंबित करण्यात आले.
प्रवीण दरेकरांनी केला होता पाठपुरावा -
आतापर्यंत आमच्या माध्यमातून राज्यातील कोविड सेंटर्स प्रकरणी 150 ते 200 पत्र शासनाला देण्यात आली आहेत. मात्र, शासनाने त्यावर काहीच कारवाई केली नाही. आरोग्यमंत्री राजेश टोपे हेही हतबल झाले असून, त्यांना परिस्थिती सांभाळणे अवघड जात आहे. मृत लोकांचे परस्पर खोटे अहवाल तयार करून पैसे लाटण्याचे काम सुरू आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची आकडेवारी फुगवण्याचा हा प्रकार निषेधार्ह आणि धक्कादायक आहे. याप्रकरणी केवळ चौकशी न करता तातडीने संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली होती.