नवी मुंबई : नवी मुंबईकरांचे स्वप्न अखेर पूर्ण होणार असून आजपासून बहुचर्चित नवी मुंबई मेट्रो सुरू होणार आहे. नवी मुंबईतील बेलापूर ते पेंधर दरम्यान ही मेट्रो सेवा असणार आहे. नवी मुंबईकरांचे मेट्रोचे स्वप्न अखेर पूर्ण झाल्यानं नवी मुंबईकरांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
लोकार्पणाच्या वादात अडकली मेट्रो : गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबई मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालं आहे. मात्र, ही मेट्रो सेवा लोकार्पणच्या वादात अडकलेली होती. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा आदेश काढल्यानंतर आजपासून बेलापूर ते पेंधर असा पहिला टप्पा सुरू होणार आहे.
14 वर्षांपासून मुंबईकरांना मेट्रोची प्रतीक्षा : नवी मुंबई शहराचा विस्तार वाढत आहे. या वाढत्या शहराच्या विस्ताराला मेट्रोची अत्यंत गरज होती. यामुळं गेल्या 14 वर्षांपासून नवी मुंबईकर मेट्रोची प्रतीक्षा करत होते. अखेर आजपासून नवी मुंबई मेट्रो सुरू होणार असून, बेलापूर ते पेंधर या मार्गावर धावणार आहे. तळोजा परिसरात लोकवस्ती वाढली असून तेथे मेट्रोची अत्यंत आवश्यकता होती. यामुळं प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून नवी मुंबई मेट्रो सुरु करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. त्यामुळं आज दुपारी तीन वाजता बेलापूर ते पेंधर या मार्गावरून लोकार्पण सोहळा न करता मेट्रो प्रवासी सेवा सुरू करण्यात येणार आहे.
प्रवाशांना काय होणार फायदा : आजपासून सुरू होणाऱ्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील बेलापूर ते पेंधर या पहिल्या टप्प्यात मेट्रो सेवा सुरू होणार आहे. यामुळं नवी मुंबईकरांचा बेलापूर ते तळोजा नोड दरम्यानचा वेळ वाचणार आहे. मेट्रोच्या रुपात जलद, आरामदायी प्रवास मुंबईकरांना उपलब्ध होणार आहे. या मेट्रोमुळं विकसित होणाऱ्या शहराला नवी मुंबई शहराशी जोडणारी कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.
नवी मुंबई मेट्रोचे तिकिट दर : मेट्रोचे तिकिटदर हे ० ते २ किमीच्या टप्प्यासाठी 10 रुपये 2 ते 4 किमीसाठी 15 रुपये, 4 ते 6 किमीसाठी 20 रुपेय, 6 ते 8 किमीसाठी 25 रुपये, 8 ते 10 किमीसाठी 30 रुपये आणि त्यापुढील टप्प्यासाठी 40 रुपये तिकीट दर आहेत.
दर पंधरा मिनिटानं धावणार मेट्रो : नवी मुंबई बेलापूर ते पेंधर मेट्रो दरम्यानचा प्रवास 11 किलोमीटरचा आहे. मेट्रोची शेवटची फेरी रात्री 10 वाजता असणार आहे. शनिवारी 18 नोव्हेंबरपासून 2023 पेंधर ते बेलापूर या स्टेशनदरम्यान सकाळी 6 वाजता पहिली मेट्रो धावणार आहे.
हेही वाचा -