मुंबई - मालमत्ता बाजारपेठेवरील कोरोना आणि लॉकडाऊनचा इफेक्ट कमी करण्यासाठी राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात (स्टॅम्प ड्युटी) 3 टक्क्यांनी कपात केली आहे. या घर खरेदीदारांसाठी मोठा दिलासा ठरत आहे. पण यापेक्षा मोठा दिलासा आता नरेडको (नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलने) दिला आहे. कारण आता नरेडकोच्या प्रकल्पात घरखरेदी करणाऱ्यांना दोन टक्केही मुद्रांक शुल्क भरावे लागणार नाही. नरेडकोने झिरो स्टॅम्प ड्यूटी योजना आणली असून या योजनेनुसार 31 डिसेंबरपर्यंत नरेडकोच्या सदस्य बिल्डरांच्या प्रकल्पात घरखरेदी करण्याऱ्यास याचा लाभ मिळणार असल्याची माहिती राजन बांदीलकर, उपाध्यक्ष, नरेडको यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे.
1000 बिल्डरांच्या प्रकल्पात लाभ -
राज्य सरकारने ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात मुद्रांक शुल्कात 2 टक्क्यांची कपात केली आहे. ही कपात 31 डिसेंबर 2020 पर्यंत लागू आहे, तर 1 जानेवारी ते 21 मार्च 2021पर्यंत ही कपात दोन टक्क्यांऐवजी तीन टक्के होणार आहे. म्हणजेच 31 डिसेंबरपर्यंत 5 टक्क्यांऐवजी 2 टक्के तर 1 जानेवारी ते 31 मार्चपर्यंत 5 टक्क्यांऐवजी 3 टक्के मुद्रांक शुल्क ग्राहकांना भरावे लागणार आहे. त्यानुसार आता 31 डिसेंबरपर्यंत नरेडकोच्या महाराष्ट्रभरातील सदस्य बिल्डरांकडून घरखरेदी करणाऱ्यांना मुद्रांक शुल्क भरावेच लागणार नाही. झिरो स्टॅम्प ड्यूटी योजनेचा लाभ घेत ग्राहकांना मुद्रांक शुल्कचा भार कमी केला आहे, तर राज्यभर नरेडकोचे 1000 सदस्य आहेत. या 1000 सदस्यांच्या प्रकल्पातील घरखरेदीत या योजनेचा लाभ घेता येणार आहे, असेही बांदीलकर यांनी सांगितले आहे.
यापूर्वीही आणली होती योजना -
राज्य सरकारने 2 टक्के मुद्रांक शुल्क केल्यानंतर नरेडकोने सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान झिरो स्टॅम्प ड्युटी योजना आणली होती. ही योजना 31 ऑक्टोबरपर्यंत लागू होती. या योजनेचा चांगला फायदा ग्राहकांनी घेतला. मोठ्या संख्येने घरे खरेदी केली. तर या योजनेमुळे 300 टक्के मुद्रांक शुल्क वाढल्याचे यावेळी नरेडकोकडून सांगण्यात आले आहे, तर आता पुन्हा डिसेंबरसाठी ही योजना आणली असून 31 डिसेंबर 2020 पर्यंत त्याचा लाभ घेता येणार आहे.