मुंबई - राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय महिला विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. मात्र, तरीही महिलाच महिलांना म्हणावे त्या प्रमाणात सहकार्य आणि पाठबळ देत नाहीत. त्यासाठी सर्वात अगोदर महिलांनी पारंपरिक मानसिकतेतून बाहेर येऊन महिलांच्या विकासासाठी सहकार्य करावे, असा सूर मुंबईत नुकत्याच आयोजित एका राष्ट्रीय चर्चासत्रात उमटला.
अमेरिकन इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी लॉ असोसिएशन आणि कृष्णा अँड सौराष्ट्र लॉ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत महिलांच्या अधिकाराविषयी एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यात दूरदर्शनच्या माजी संचालिका विजयालक्ष्मी छाबडा, प्रसिद्ध महिला उद्योजिका अलका मेहता, 'विंग वुमन'च्या प्रमुख राजीका किशोर यांच्यासह पेटंट आणि कॉपीराइट संदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिध्द असलेले तज्ञ अॅड. देवेंदू वर्मा यांनी या चर्चासत्रात मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांना नेमके कोणते अधिकार आहेत, त्या माध्यमातून महिलांना आपला विकास कसा साधता येईल याविषयी या चर्चासत्रात वक्त्यांनी आपले विचार मांडले. महिलांचे अधिकार, त्यांचे साहित्य, कला, संशोधन आदींचे कॉपीराईट यांचे अधिकार अबाधित ठेवण्यासाठी आत्तापर्यंत अमेरिकन इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी असोसिएशन आणि कृष्णा अँड सौराष्ट्र लॉ असोसिएशनच्यावतीने मुंबईसह दिल्ली, बंगलोर येथेही ३ चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यावेळी आयोगाकडून देण्यात आले.
विंग वुमनच्या प्रमुख राजीका किशोर म्हणाल्या, की महिलांना आता आपल्या विकासासाठी फार अडचण होते अशी परिस्थिती राहिली नाही. केवळ अडचणी असतात असा समज मनातून काढून ठेवण्याची गरज आहे. अलीकडे पतीचा पाठिंबा मोठ्या प्रमाणात मिळत आहे. पात्र कुटुंबातून काही अडचणी निश्चितच आहेत. मात्र, त्यावरही मात करता येते. ग्रामीण भागातील महिलांना आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी अनेक प्रकारच्या मर्यादा येतात. त्याचा अंदाज असला तरी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना वेगवेगळ्या प्रकारचे सहकार्य मिळते. ही बाब तितकीच महत्त्वाची आहे.
निती आयोगाने अनेक प्रकारचे सूचना दिलेल्या आहेत. संसदेत महिलांच्या आरक्षणाचे विधेयक अजून प्रलंबित असून ते मार्गी लागले पाहिजे. तरच देशातील मुलींच्या होणाऱ्या भ्रूणहत्या, महिलांवर होणारे अन्याय आणि मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकतो. संसदेत तर महिलांची संख्या वाढली तर महिलांच्या अधिकारांविषयी अधिक जागरूकता निर्माण होईल असेही त्या म्हणाल्या. तर विजयालक्ष्मी छाबडा यांनी आपल्या जीवनातील संघर्ष आणि त्यातून मिळालेल्या यशाची माहिती दिली.
यावेळी अलका मेहता म्हणाल्या, की गृहिणी असतानासुद्धा आपण सुरू केलेला उद्योग आज युरोपीय देशापर्यंत पोहोचला असून त्यासाठी आपल्याला मोठे परिश्रम घ्यावे लागले. परिश्रम घेण्याची तयारी असलेल्या कोणत्याही महिलेला आपला विकास साधता येतो. त्यासाठी त्यांनी अवांतर आपल्या विकासासाठी परिश्रम केले पाहिजे.
दरम्यान, या परिसंवादाला आवर्जून उपस्थित असलेल्या विद्यार्थिनीनीही या परिसंवादात आपल्याला अनेक नवीन गोष्टी ऐकायला मिळाले असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या. विधीचे शिक्षण घेणाऱ्या राधिका जोशी हिने सांगितले, की आज जे ऐकले ते अत्यंत प्रेरणादायी महिलांचे म्हणणे होते. त्यांच्या मार्गदर्शनातून आम्हालाही प्रेरणा मिळाली आणि आयुष्यात येणाऱ्या प्रश्नांना सामोरे कसे जावे, आपली प्रगती कशी करावी हे कळले. तर प्रियंका मराठे हिने महिलांच्या प्रश्नावर आम्हाला आज शिकता आले. त्यामुळे अशाप्रकारचे चर्चासत्र देशभरात कायम सुरू ठेवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.