मुंबई Naresh Goyal Wife gets Bail : जेट एअरवेज कंपनीचे संस्थापक नरेश गोयल यांना सक्त वसुली संचालनालयानं बेकायदेशीर आर्थिक व्यवहार प्रकरणात कोठडी सुनावलेली आहे. त्यांच्या पत्नी अनिता गोयल यांच्यावरही गुन्हा दाखल आहे. परंतु, त्यांनी या गुन्ह्यात जामीन मिळण्यासाठी पीएमएलए न्यायालयात अर्ज केला होता. पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश एम जी देशपांडे यांनी 2 लाख रुपयांच्या बॉण्डवर हा जामीन अर्ज मंजूर केलाय. त्यामुळं अनिता गोयल यांना काही प्रमाणात दिलासा मिळालाय.
नेमकं प्रकरण काय : ईडीनं कॅनडा बँकेच्या 538 कोटी रुपयांच्या बेकायदेशीर आर्थिक व्यवहारात ऑगस्ट 2023 मध्ये जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना अटक केली होती. सक्तवसुली संचालनालयाच्या तपास कामांमध्ये नरेश गोयल सहकार्य करत नसल्याचा आरोप करत ईडीनं त्यांना अटक केली होती. ते सध्या मुंबईच्या भायखळा तुरुंगात आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नीवर आणि त्यांच्या नातेवाईकांवर देखील बेकायदा आर्थिक गैरव्यवहार केल्याचे गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यांच्या पत्नीकडून याबाबत जामीन मिळवण्यासाठीचा अर्ज पीएमएलए न्यायालयात दाखल केला होता. हा अर्ज पीएमएलए न्यायालयानं 24 नोव्हेंबर रोजी मंजूर केलाय. बेकायदेशीर आर्थिक व्यवहार प्रतिबंध कायद्याच्या कलम 88 च्या अंतर्गत हा जामीन दिला गेला आहे.
अटी शर्थींवर अनिता गोयल यांना जामीन मंजूर : यासंदर्भात आरोपी अनिता गोयल यांच्या वकिलांनी न्यायालयाला विनंती केली की, बेकायदा आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात नरेश गोयल यांच्यासोबत त्यांची पत्नी अनिता गोयल यांचीही चौकशी सुरू आहे. परंतु, अनिता गोयल यांच्या संदर्भातील तपास पूर्ण झालेला आहे. त्यामुळं न्यायालयानं त्यांना जामीन मंजूर करावा. यावर पीएमएलए न्यायालयानं उपलब्ध तथ्य आणि दस्ताऐवजाच्या आधारे नरेश गोयल यांच्या पत्नी अनिता गोयल यांचा जामीन अर्ज मंजूर केलाय. मात्र या संदर्भातील तपासात सहकार्य करण्याची अट देखील न्यायालयानं घातलीय.
गोयल कुटुंबाच्या बेकायदेशीर मालमत्तेची चौकशी : ईडीच्या तपासानुसार नरेश गोयल यांनी सुमारे 6000 कोटी रुपयांचं कर्ज बुडवलंय. फॉरेन्सिक अकाउंटंट परीक्षेतील कन्सल्टन्सी तसंच प्रोफेशनल फीच्या नावावर सुमारे 1 हजार 152 कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले आहेत. तसंच गोयल यांनी सुमारे 40 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप ईडीनं केला आहे. जेट एअरवेजचं कर्ज फेडण्यासाठी 2,547 कोटी 83 लाखांचा वापर करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षात नरेश गोयल यांच्या कुटुंबीयांना 9 कोटी 46 लाख रुपये देण्यात आले. त्यात गोयल यांच्या पत्नी अनिता गोयल, मुलगी नम्रता गोयल, मुलगा निवान गोयल यांचा समावेश आहे. सन 2011-12 ते 2018-19 या कालावधीत कंपनीकडून विविध कारणं देत ही रक्कम पाठवण्यात आली आहे. त्यामुळं ईडी काही परदेशी कंपन्यांची, तसंच गोयल कुटुंबाच्या मालमत्तेची चौकशी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा :