नवी मुंबई - सातारा लोकसभा मतदार संघात भाजपचे उमेदवार म्हणून माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांचे नाव पुढे आले आहे. मात्र, अधिकृत घोषणा होण्याआधी नरेंद्र पाटील यांनी निवडणुकीचे बिगुल फुंकले आहे. एपीएमसीमधील माथाडी भवनमध्ये आज माथाडी कामगारांची सभा घेण्यात आली. यावेळी नरेंद्र पाटील यांनी जावळी तालुक्यात ४ हजार शेतकऱ्यांचे सातबारा खासदार उदयनराजे भोसले यांच्या संस्थेच्या नावावर असल्याचा गंभीर आरोप करून प्रचाराचा नारळ फोडला आहे.
सातारा लोकसभा उमेदवारीची शक्यता असल्याने नरेंद्र पाटील यांच्यासाठी माथाडी कामगारांची भव्य सभा माथाडी भवनात गुरुवारी घेण्यात आली. यावेळी व्यापारी नेते मोहन गुरनाणी, अशोक बढिया, नगरसेविका भारती पाटील, नगरसेवक चंद्रकांत पाटील, माजी नगरसेवक रविकांत पाटील, रवींद्र म्हात्रे अशा विविध राष्ट्रवादी पक्षाशी संबंधित नेत्यांनी व्यासपीठावर हजेरी लावल्याने आता माथाडी कामगार संघटना विभागली जाण्याची शक्यता आहे.
जावळी तालुक्यातील शेतकऱ्यांचा सातबारा भोसले घराण्याच्या संस्थेचे नावावर असल्याचा खळबळजनक आरोप पाटील यांनी करत आगामी निवडणूक प्रचाराची चुणूक दाखवून दिली आहे.
राजकीय धाडस असल्याशिवाय पुढचे पावूल टाकता येत नाही. माथाडी कामगारांमुळे मी हे धाडस दाखवत आहे. सातारा मिसळ पॅटर्न आता दिल्लीपर्यंत गाजल्याने आता माथाडी कामगारांचा आवाज थेट दिल्लीमध्ये घुमणार असल्याने साथ देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे. इतकी वर्षे आघाडी सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, युतीच्या सरकारने त्या महामंडळाला पुनुर्जिवित केले. त्यामुळे मराठा आणि माथाडी कामगारांना न्याय मिळाला, असे पाटील यांनी स्पष्ट केले.