मुंबई - लोकसभा निवडणूकीत नागपूर मतदारसंघात झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी आज (शनिवारी) अखिल भारतीय किसान काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा देशभरात दारुण पराभव झाला. या पराभवाची जबाबदारी स्वीकारत अनेकांनी आपल्या पदाचे राजीनामे देण्याचे सत्र सुरू आहे. यातच पटोले यांनी आपला राजीनामा पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना सोपवला असल्याची माहिती प्रदेश काँग्रेसकडून देण्यात आली.
![Nana patole given in writing to party president rahul gandhi to resign letter](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/_29062019190823_2906f_1561815503_677.jpg)
यासंदर्भात पटोले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून हा राजीनामा दिला असल्याचे सांगत, पक्ष यापुढे जे काम सांगेल ते करणार असल्याचे स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकांमधील काँग्रेसच्या पराभवानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जबाबदारी स्वीकारत पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आत्तार्यंत पक्षातील 120 नेत्यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला आहे.
त्या पार्श्वभूमीवर आज राहुल गांधी यांच्या दिल्लीतील तुघलक लेन येथील निवासस्थानी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला राज्यातून पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे, वर्षा गायकवाड, राजीव सातव, के.सी. वेणुगोपाल, रजनी पाटील उपस्थित होत्या. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ अ.भा. किसान काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.