मुंबई: राज्यात दसऱ्यानंतर भरपूर पाऊस झाला. पावसामुळे अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणी साचलं आहे तर अनेक शेतकऱ्यांचं उभारीला आलेलं पीक वाया गेलं आहे. आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी शासनाला आवाहन केलं आहे की, शासनाने त्वरित कापूस, तूर व धान यांचे खरेदी केंद्र सुरू करावे आणि शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा. (demand to open cotton and paddy buying center)
काय म्हणाले नाना पटोले? : यासंदर्भात नाना पटोले यांच्याशी ईटीव्ही भारत वतीने संवाद साधला. पटोले शासनाला आवाहन करताना म्हणाले, "धान खरेदीसाठी असलेल्या ऑनलाईन नोंदणीच्या अटीमुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. दुर्गम भागातील अनेक आदिवासी व शेतकरी ऑनलाईन नोंदणी करू शकले नाहीत, त्यामुळे त्यांच्या मालाची अद्याप खरेदी झाली नाही. यामुळे सरकारने ऑनलाईन नोंदणीची अट रद्द करून तात्काळ पुरेशी केंद्र सुरु करावीत आणि शेतकऱ्यांचा कापूस व धान खरेदी करून अडचणीतील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
खाजगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट: परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकरी मोठ्या अडचणींचा सामना करत असून या पावसाने राज्यातील बहुतांश खरीपाची पीके पाण्यात वाहून गेली आहेत. शेतकऱ्यांची सोयाबीन, तूर, उडीद, मूग, मका ही पीके पूर्णपणे वाया गेली आहेत. तर काही जिल्ह्यांमध्ये थोडा कापूस आणि भाताचे पीक शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने वाचवले आहे. या नैसर्गिक संकटा सोबतच आता शेतकऱ्यांना सरकारी अनास्थेलाही तोंड द्यावे लागत आहे. सरकारने अद्याप पुरेशा प्रमाणात कापूस आणि धान खरेदी केंद्र सुरु केली नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांनाच त्यांचा शेतमाल विकावा लागतो आहे. आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची आता खासगी व्यापाऱ्यांकडून देखील लूट सुरु आहे.