मुंबई - महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयाने अनोखा विक्रम केला आहे. नायरमध्ये कोरोनाबाधित असलेल्या 500 व्या गर्भवतीचे सुखरूप बाळंतपण करण्यात आले. मंगळवारी सकाळी 500 वे बाळंतपण झाले आणि रुग्णालयातील स्त्रीरोग विभागाने एकच जल्लोष केला.
आतापर्यंत 723 कोरोनाबाधित गर्भवतींवर उपचार, 500 वे बाळंतपण आणि एक ही मृत्यू नाही. त्यामुळे ही गोष्ट जल्लोष करण्यासारखीच आहे. भारतात आतापर्यंत कुठेही एकाचवेळी इतक्या संख्येने कोरोनाबाधित गर्भवतींचे बाळंतपण झालेले नाही. हा विक्रम आमच्या रुग्णालयाने केला आहे. त्यामुळे नक्कीच ही आनंदाची, अभिमानाची बाब असल्याची प्रतिक्रिया मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.
मुंबईत कोरोनाचा कहर वाढल्यानंतर नायरमध्ये खास कोरोनाबाधित गर्भवतींवर उपचार करण्यासाठी विशेष कक्ष सुरू करण्यात आला. या कक्षात हळूहळू कोरोनाबाधित गर्भवतींची संख्या वाढत जाऊ लागली. त्यामुळे आधी 50 मग 100 बाळंतपण झाली. ही बाळंतपण सुखरूप तर झालीच पण जन्मास आलेली बाळंही ठणठणीत आणि कोरोना निगेटिव्ह होती. पुढे नायरमध्ये मुंबईभरातून कोरोनाबाधित गर्भवती महिलांचे उपचारासाठी दाखल होण्याचे प्रमाण वाढत गेले नि 100 वरून 200, 300, 400 करत आता 500 वे बाळंतपण येथे झाले आहे.
मंगळवारी सकाळी 10 वाजून 4 मिनिटांनी मालाडमधील 30 वर्षीय कोरोनाबाधित मातेने बाळाला जन्म दिला. हे बाळंतपण 500 वे बाळंतपण ठरले आहे. आतापर्यंत या रुग्णालयात 723 कोरोनाबाधित गर्भवती उपचारासाठी दाखल झाल्या आहेत. यातील 660 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर यातील 500 रुग्णांचे सुखरुप बाळंतपण झाले असून जन्म घेतलेल्या बाळांचा आकडा 508 असा आहे. तर यात एका तीळ्या तर तब्बल 8 जुळ्या मुलांचा समावेश आहे, अशी माहिती नायरचे नोडल ऑफिसर डॉ. नीरज महाजन यांनी दिली. तर ही सर्व बाळं सुखरूप असून एकूण बाळांपैकी केवळ 10 बाळं कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. पण आता ही बाळं ही कोरोनामुक्त झाली आहेत.