नागपूर - महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे लबाड आहेत, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते दयाशंकर तिवारी यांनी केली. महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आजही काँग्रेस नगरसेवक नितीन साठवणे यांनी मंगळवारी दिलेल्या स्थगन प्रस्तावावर चर्चा झाली. यामध्ये भाजपचे जेष्ठ नेते दयाशंकर तिवारी यांनी मॅरेथॉन चार तास भाषण केले.
आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मनमानी कारभारावर टीका करताना त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. यामुळे सभागृहाचे कामकाज शुक्रवारी ११ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. दयाशंकर तिवारी म्हणाले, तुकाराम मुंढे लबाड आहेत. ते जनसेवेचा खोटा मुखवटा घालून वावरत आले आहेत.
तसेच आयुक्त मुंढे हे आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांना कायद्याची पायमल्ली करण्याची मोकळीक दिल्याचे अनके दाखले त्यांनी सभागृहासमोर मांडले. यामध्ये महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी कशा प्रकारे मनमानी कारभार करत आहेत. याचे अनेक पुरावेही त्यांनी सभागृहात सादर केले.
सलग तिसऱ्या दिवशीही नागपूर महापालिकेच्या सभेत आयुक्त तुकाराम मुंढे यांना घेरण्याचा प्रयत्न भाजपसह सर्वपक्षीय नगरसेवकांकडून झाला. तर काँग्रेसने काही प्रमाणात त्यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला.
कोरोना काळात झालेली कामे आणि त्यातील उणिवा दाखविण्याचा प्रयत्न करत आयुक्त कशा प्रकारे एकाधिकार राबवितात हे दाखविण्याचा प्रयत्न भाजप नगरसेवकांनी केला. तिवारी यांनी गुरुवारी सलग चार तास भाषण केले. यानंतर कामकाज उद्या (शुक्रवार) पर्यंत स्थगित करण्यात आले आहे. तर या आरोपांना आयुक्त मुंढे उत्तर देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.