मुंबई - राजभवन येथे राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या संयुक्त मंडळाची बैठक राज्यपाल कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली आज गुरुवार (दि. ५ जानेवारी)रोजी संपन्न झाली. या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आणि उच्च स्तरावरील अधिकारी तसेच विद्यापींठाचे कुलगुरू उपस्थित होते. (NAC evaluation process) त्या त्या भागातील भौगोलिक परिस्थितीनुसार गुणवत्तापूर्ण शिक्षण सहज आणि सुलभ उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे. यासाठी सर्वांचे मार्गदर्शन आणि साथ महत्त्वाची आहे, शैक्षणिक अडचणी आणि त्यावर उपाययोजनासाठी विद्यापीठ आणि राज्य शासन यांनी समन्वयातून कार्य करावे असे आवाहनही कोश्यारी यांनी यावेळी केले आहे.
विद्यार्थी हितासाठी शैक्षणिक वेळापत्रक - विद्यापीठ आणि महाविद्यालयाचे परीक्षा वेळापत्रक, परीक्षेचे निकाल वेळेत जाहीर करणे, सीईटी प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करून शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू होणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व विद्यापीठांनी नियोजन करावे, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या आहेत. मंत्री म्हणाले, 'राज्यातील विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या परीक्षा (दि. ३१ मे)पर्यंत पूर्ण होतील याचे नियोजन करून (दि. ३० जून)पर्यंत निकाल जाहीर करावेत. जून-जुलैमध्ये सीईटी परीक्षा, निकाल आणि प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून (दि. १ ऑगस्ट)पासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासाठी वेळापत्रकाचे नियोजन करावे. विद्यार्थी हितासाठी शैक्षणिक वेळापत्रकाचे नियोजन करावे. त्यामुळे विद्यार्थ्यांना राज्याबाहेर आणि देशाबाहेर असलेल्या उच्च व तंत्र शिक्षणाच्या संधी अधिक उपलब्ध होण्यास मदत होईल आणि विद्यार्थ्यांचा मानसिक त्रासही कमी होईल असही ते म्हणाले आहेत.
नवीन शैक्षणिक धोरण - विद्यापीठ आणि महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन केलेच पाहिजे. ज्या महाविद्यालयांना पाच वर्षापेक्षा अधिक काळ झालेला आहे. त्यांनी नॅक मूल्यांकन प्रक्रिया केली नाही. अशा महाविद्यालयाचे प्रथम वर्ष प्रवेश बंद करण्यात येईल. तसेच, नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये अधिकाधिक स्पष्टता आणून येत्या शैक्षणिक वर्षांपासून अंमलबजावणीला गती द्यावी. याबाबत कुलगुरूंच्या बैठकीत चर्चा झाली आहे.
शिक्षणामध्ये विद्यार्थी संख्या विशेषत - महिलांची संख्या वाढविण्यासाठी विद्यापीठाने प्रयत्न करावेत. यासाठी आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन सहकार्य करेल, असेही पाटील यांनी सांगितले आहे. या बैठकीत उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रस्तोगी यांनी शैक्षणिक गुणवत्ता आणि सद्य:स्थिती याबाबत सादरीकरण केले आहे. यावेळी विद्यापिठ स्तरावर गुणवत्ता आणि त्यामधील आंतरराष्ट्रीय स्तरावर होणारा अभ्यास यावरही विचार मंथन करण्यात आले आहे.