मुंबई - ज्यांच्याशी तीस वर्षे मैत्री केली, त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही. पण, ज्यांच्याशी तीस वर्षे सामना केला त्यांनी माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवला, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. ते महाविकास आघाडीच्या बैठकीत बोलत होते. आघाडीच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
उद्धव ठाकरे म्हणाले, की मी स्वप्नातही कधी विचार केला नव्हता की मला काही व्हायचे आहे. माझ्या घराण्याची परंपरा सांभाळण्याचा प्रयत्न मी केला. आता आम्ही सगळे मिळून राज्याला वेगळी दिशा देऊ, असा विश्वास ठाकरे यांनी दिला.
यावेळी ठाकरे यांनी सोनिया गांधींसहीत आघाडीच्या सर्व नेत्यांचे आभार मानले. ते म्हणाले, की या सरकार मध्ये जितके अनुभवी लोक असतील तितके याआधी कधीच नसतील. आता हमरातुमरीवर येऊ नका हे सरकार आपलेच आहे, असेही ठाकरे मिश्किलपणे म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांच्या टीकेवरही ठाकरेंनी टिप्पणी केली. फडणवीसांच्या टीकेचे वाईट वाटले. भाजपने गरज सरताच दूर केले अशी खंत त्यांनी व्यक्त केली. शिवसेना तुमच्या पालख्या वागवण्यासाठी नाही असा टोला त्यांनी भाजपला लगावला. शपथविधीनंतर आपण मोठ्या भावाला म्हणजेच मोदींना भेटायला जाणार आहोत असे ठाकरे म्हणाले.