मुंबई : राज्यात सर्वच पक्ष आगामी 2024 च्या निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. भाजपला टक्कर देण्यासाठी देशातील प्रमुख पक्ष व प्रादेशिक पक्ष सध्या एकत्र येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व राहुल गांधी यांची दिल्लीत भेट झाली. आता राहुल गांधी हे मुंबईत मातोश्रीवर येऊन आगामी रणनीतीबाबत उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार असल्याचे बोलले जात आहे. विरोधी पक्षाच्या या तयारीवर भाजपकडून टीका केली जात आहे.
राहूल गांधी मातोश्रीवर : भाजपला टक्कर देण्यासाठी देशातील प्रमुख पक्ष व प्रादेशिक पक्ष सध्या एकत्र येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व राहुल गांधी यांची दिल्लीत भेट झाली. याबाबत बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, प्रादेशिक पक्ष किंवा राष्ट्रीय पक्ष सर्व एकत्र येणे याला सुरुवात झालेली आहे. ही आशादायी गोष्ट आहे. महाराष्ट्रात आम्ही 48 पैकी 40 जागा जिंकू असे वातावरण आहे. सोमवारी संध्याकाळी काँग्रेसचे सरचिटणीस येऊन उद्धव ठाकरेंना भेटणार आहेत. या भेटीत भविष्यातल्या अनेक गोष्टी ठरतील, राहुल गांधी येतील तेव्हा काय चर्चा करायची आहे हे ठरेल. सत्ताधाऱ्यांचा विश्वास तुटून पडेल अशा प्रक्रिया सुरू झालेल्या आहेत.
कायद्याचे राज्य प्रस्थापित करणे गरजेचे : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे रोज सकाळी आपल्या निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधतात. यावेळी ते राज्यातील विविध घडामोडींवर आपली प्रतिक्रिया देत असतात व भाजप आणि शिवसेना शिंदे गटावर टीका देखील करत असतात. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. त्यांच्या टीकेला उत्तर देताना खासदार राऊत म्हणाले की, तुम्ही साडेनऊ वाजता पत्रकार परिषद घ्या. नाहीतर तुमच्या सागर बंगल्याच्या बाहेर येऊन मी पत्रकार परिषद घेतो. याचा अर्थ असा होतो की, ते आम्हाला घाबरतात. शिवसेना जरी तुम्ही कागदावर दुसऱ्याला दिली तरी खरी शिवसेना तिथेच आहे. तुम्ही कायद्याने राज्य करा. तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधी पक्षांना खतम करण्याचे कारस्थान तुम्ही करत असाल तर आम्ही बोलणार. तुम्ही तुमची कारस्थाने थांबवा आम्ही तुमच्यावरील हल्ले थांबवू. या देशांमध्ये संविधान नाही. कायद्याचे अस्तित्व नाही. हम करे सो कायदा हे संविधानाचे राज्य नाही. बाबासाहेब आंबेडकरांना जर श्रद्धांजली व्हायचे असेल तर पुन्हा एकदा कायद्याचे राज्य प्रस्थापित करणे गरजेचे आहे, असे राऊत म्हणाले.
उत्तर प्रदेशात माफिया राज : उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरबाबत बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, उत्तर प्रदेशमध्ये माफिया राज आहे असे तिथल्या लोकांचे आणि राजकीय लोकांचे मत आहे. कायदेशीर कार्यवाही बरोबर पोलिसांना हातात हत्यार उचलावे लागत असेल तर, तो त्या सरकारच्या भाग आहे. एन्काऊंटरमध्ये जात आणि धर्म आणू नये. गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो. बेकायदेशीरपणे अशा हत्या होत असतील तर नक्कीच न्यायालयाचे दरवाजे उघडे आहेत. दरम्यान, आगामी 2024 च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रमुख पक्ष व प्रादेशिक पक्ष एकत्र येत आहेत. अशात नितीश कुमार देखील सामील होणार का? यावर बोलताना खासदार राऊत म्हणाले की, अद्याप त्याबाबत चर्चा झालेली नाही. विरोधी पक्षाने एकत्र येऊन निवडणुका आढाव्यात आणि काम करावे. तसेच निवडणुका जिंकाव्या हे महत्त्वाचे आहे.