मुंबई: संजय राऊत यांच्यावर हक्कभंग आल्यानंतर महाविकास आघाडीने देखील कंबर कसली आहे. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांची देशद्रोह्यांशी तुलना केल्याने त्यांच्यावर हक्कभंग दाखल करावा, अशी मागणी करत महाविकास आघाडीच्या आमदारांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे नोटिस सादर केली.
हक्कभंगाची नोटिस: विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ही नोटीस परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे यांच्या कार्यालयात सादर केली. नीलम गोऱ्हे यांनी ही नोटीस स्वीकारली आहे. तसेच पुढील कारवाईसाठी हक्कभंग समितीकडे त्यांनी ही हक्कभंगाची नोटीस सोपवली आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह कॉंग्रेस, राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारांच्या सह्यांच्या पत्र देण्यात आले आहे. अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी हा मुद्दा चांगलाच गाजणार आहे.
![MVA Vs Eknath Shinde](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-danve-on-cm-hakkabhang-7209781_01032023191131_0103f_1677678091_479.jpg)
विषय सभापतींनी राखून ठेवला: खासदार संजय राऊत यांनी विधानभवन नव्हे चोर भवन असे वादग्रस्त वक्तव्य केल्याचे तीव्र पडसाद आज विधानभवनात उमटले. अधिवेशनाचा तिसरा दिवस संजय राऊत यांच्या विधानावर गाजला. दोन्ही सभागृहाचे कामकाज या मुद्द्यावरुन दिवसभरासाठी स्थगित केले. तर विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या विधानावर आक्षेप घेतला. मुख्यमंत्री शिंदे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीच्या नेत्यांची तुलना देशद्रोह्यांशी केली. विरोधकांनी पहिल्याच दिवशी हा मुद्दा सभागृहात लावून धरला. परंतु, राज्यपाल अभिभाषणावरील चर्चेसाठी हा विषय सभापतींनी राखून ठेवला होता.
विशेषाधिकार भंग करावा: संजय राऊत यांच्या विरोधात सत्ताधारी पक्ष आक्रमक झाल्यानंतर महाविकास आघाडीनेही सत्ताधाऱ्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी हालचाली वाढवल्या आहेत. आज विधान परिषद अधिनियम २४१ अन्वये मुख्यमंत्री यांच्याविरुध्द विशेषाधिकारभंग दाखल करावा, अशी मागणी केली. मुख्यमंत्री शिंदे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापान कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विरोधकांनी यावर बहिष्कार टाकला होता. राज्यात शेतकरी, विद्याथ्यांचे प्रश्न, कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर बहिष्कार घातल्याचे पत्र मुख्यमंत्री सचिवालय विभागाला दिले होते.
मुख्यमंत्री शिंदेंचे वक्तव्य: मुख्यमंत्री शिंदे यांनी देशद्रोह्यांबरोबर चहापान टळले, असे वक्तव्य पत्रकार परिषदेत केले होते. राज्याच्या प्रमुख पदी असलेल्या लोकप्रतिनिधींनी अशा भाषेचा वापर केल्यामुळे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला आहे. मुख्यमंत्र्यांच्या विधानामुळे सार्वभौम सभागृहाचा विशेषाधिकाराचा भंग, अवमान झाला आहे. या पत्रावर आमदार सतेज पाटील, शशिकांत शिंदे, राजेश राठोड, सचिन अहीर, सुनील शिंदे, अभिजीत वंजारी, वजाहत मिर्झा यांच्या सह्या करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या यामुळे अडचणी वाढणार आहेत.
हेही वाचा: Nitesh Rane Threat Sanjay Raut : नितेश राणे म्हणाले; राऊतांना फक्त आमच्या ताब्यात द्या...