मुंबई MVA Delegation Met Governor : सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा (Maratha Reservation Issue) चांगलाच तापला आहे. तसेच राज्यातील अनेक भागात दुष्काळाची परिस्थिती आहे. शेतमालाला भाव नाही. ड्रग्जचे मोठे साठे सापडले असून, राज्यात कायदा व सुव्यस्थेचा बोजवारा उडला आहे. तसेच मराठा व ओबीसी समाजामध्ये सरकारबद्दल तीव्र नाराजी व संताप आहे. या समाजांकडून आरक्षणाची मागणी होत असताना सरकारी पातळीवर समाधानकारक काम होताना दिसत नाही. तसेच मराठा आरक्षणावरून मराठा बांधव आक्रमक झालाय. अनेक ठिकाणी जाळपोळ, नेत्यांना गावात प्रवेशबंदी आदी कारणामुळं मराठा समाजातील तरुण पेटून उठलाय. सरकार यावर ठोस भूमिका घेत नाही. त्यामुळं राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन तातडीने बोलवावं, अशी मागणी महाविकास आघाडीच्या शिष्ठमंडळानं राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांच्याकडे केली. यावेळी मविआतील अनेक नेते उपस्थित होते.
राज्यपालांना दिलं निवेदन: महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं आज (सोमवारी) राज्यपाल रमेश बैस यांची राजभवनभर भेट घेऊन निवेदन दिलं. यावेळी राज्यातील विविध प्रश्नांवरून तातडीने विशेष अधिवेशन बोलवण्यात यावं, अशी निवेदनातून मागणी केली. राज्यात सप्टेंबर महिन्यापासूनच विविध जिल्ह्यात टँकरने पाणी पुरवठा करावा लागतोय. पावसाअभावी २४ जिल्ह्यातील खरीप पीकं वाया गेली आहेत. राज्यात दुष्काळ आणि शेतीचे प्रश्न गंभीर झाले आहेत; पण राज्य सरकारचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होतयं. रब्बी हंगामाची स्थितीही फारशी चांगली नाही. शेतकऱ्यांची दिवाळी उजळून निघाली पाहिजे. त्यासाठी राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करून तातडीनं मदत दिली पाहिजे. अशी मागणी यावेळी मविआतील शिष्ठमंडळानं राज्यपालांकडे केली.
आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा: राज्यात कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली असून मराठा समाजातील तरुण आत्महत्या करतोय. मराठा समाजात असंतोषाची भावना असून उद्रेक होईल अशी स्फोटक परिस्थिती आहे. नेत्यांना मतदारसंघात फिरणं अवघड झालं आहे. राज्यपाल हे केंद्र आणि राज्य सरकारमधील दुवा आहेत. त्यांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांशी आरक्षण विषयावर बोलून हा प्रश्न मार्गी लावावा, असं मविआ शिष्ठमंडळानं निवेदनातून म्हटलंय. तसेच राज्यात लाखोंच्या संख्येने तरुण बेकार आहेत. राज्यातील आरोग्य सेवा कोलमडलेली आहे. महिला व मुलींचं बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढलंय. बेरोजगारीचा प्रश्नही मोठा आहे. त्यामुळं राज्य शासनानं तातडीनं विशेष अधिवेशन बोलवावं, अशी मागणी महाविकास आघाडीतील शिष्ठमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे केली. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, राजेश टोपे, वर्षा गायकवाड आदी उपस्थित होते.
हेही वाचा: