मुंबई - आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीने रणनिती आखली आहे. त्यासाठी आज महाविकास आघाडीची यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बैठक झाली. विधान परिषदेच्या तीन शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या अंतिम दिवस आहे. यात पाच जागांपैकी काँग्रेसला दोन, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप आणि शिवसेनेला प्रत्येकी एक जागा वाट्याला आली आहे. भाजपचे पाळेमुळे घट्ट असलेल्या नागपूरची जागा शिवसेनेला सोडण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेला नागपूरचा अवघड पेपर दिल्याची चर्चा सध्या सुरू आहे. दरम्यान महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष शक्ती प्रदर्शन करत उद्या नामांकन अर्ज भरणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली .
नागपूरच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही विधानपरिषदेच्या तीन शिक्षक मतदारसंघ आणि दोन पदवीधर मतदार संघासाठी निवडणूक जाहीर झाली आहे. नाशिक, अमरावती या दोन पदवीधरच्या जागांचा आणि औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे. विशेष म्हणजे नागपूरच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही होती. आघाडीत मतभेद असल्याची चर्चा रंगली होती. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज बैठक घेऊन शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या जागा वाटपाचा तिढा सोडवला. त्यामुळे महाविकास आघाडीत मतभेद असल्याची चर्चा निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे.
आघाडीचे एकमत महाविकास आघाडीकडून अमरावती आणि नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसला संधी दिली आहे. औरंगाबाद येथील जागा राष्ट्रवादी काँग्रेसचा देण्यात आली आहे. नागपूरची जागा शिवसेनेच्या ठाकरे गटासाठी सोडली आहे. ठाकरे गटाच्या उमेदवाराने अर्ज भरला आहे. या निवडणुकीला एकमताने जाण्याचे काम केले जाईल. आमचे सर्वांचे एकमत झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. तसेच नागपूरच्या जागेसाठी नाना पटोले यांनी महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून यावा, अशी भूमिका मांडली होती. मात्र, आता काँग्रेस त्याठिकाणी अर्ज भरणार नाही. त्या व्यतिरिक्त तिथे जे अर्ज भरणार आहेत, तेथे ही एकमत केले जाईल, असे पाटील म्हणाले.
हुकुमशाही विरोधात लढा हुकूमशाही विरोधात एकमताने लढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यासाठी ही लढाई आहे. आम्ही त्यामुळे एक पाऊल मागे आलो आहोत. पाचही जागा महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील, असा प्रयत्न करु, असे नाना पटोले यांनी सांगितले. तसेच आज बेरोजगारीचा प्रश्न महत्त्वाचा आहे. महागाई, अनेक प्रश्न आहे. जागा वाटप हा प्रश्न महत्त्वाचा नाही. आम्ही एकमताने विरोधात लढण्याचा निर्णय घेतला आहे, असे नाना पटोले यांनी सांगितले.
परिषदेत वर्चस्व कायम राखणार महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. विधान परिषदेच्या पाच ही जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक आणि अमरावती या दोन जागांवर काँग्रेस, औरंगाबादची जागा राष्ट्रवादी काँग्रेस, कोकणची जागा शेकाप तर नागपूरची जागा शिवसेना लढवणार आहे. मतदार संघातून गंगाधर नाकाडे यांनी अर्ज भरला आहे. येथील इतर उमेदवारांनी देखील अर्ज भरला आहे. हुकुमशाही व्यवस्थेविरोधात टक्कर देण्यासाठी आणि ही निवडणूक अधिक सोपी करण्यासाठी संबंधितांशी चर्चा करुन त्यांचे अर्ज मागे घेण्याबाबत प्रयत्न केले जातील. उद्या संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. राज्याच्या विधान परिषदेत महाविकास आघाडीचे वर्चस्व आहे. ते कायम राखण्यासाठी महाविकास आघाडी राखेल, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते सुभाष देसाईंनी दिली.