मुंबई : मुंबईचा देखील साहित्य संस्कृतीचा इतिहास आहे. मुंबईतच अनेक नाटक मंडळ, भजन मंडळ तयार झाली. इथल्या लालबाग, परळ भागात अनेक फड रंगायचे. हा सर्व गिरणी कामगारांच्या काळातला मुंबईतला इतिहास. याच काळात येथे भजन, नमन अशा इत्यादी प्रकारच्या लोकनाट्यांना, लोककलांना सुरुवात झाली. याच कलांमधून पुढे अनेक साहित्यिक, नाटककार महाराष्ट्राला मिळाले. या सर्व लोककलांचा मुख्य गाभा होता ती म्हणजे इथली पारंपरिक वाद्य. यामध्ये ढोलकी, नाल आणि सोबत जोड असायची ती तुणतुणे आणि हार्मोनियमची. कालांतराने मुंबईतून गिरण्या बंद झाल्या गिरणी कामगारांची वाताहत झाली आणि सोबतच या लोककलांची देखील.
मुंबईच्या बदलांचा परिणाम : मुंबईत होणाऱ्या या सर्व बदलांमध्ये मागे पडला तो हा वाद्यवृंद. जे लोक या फडांमध्ये वाद्य वाजवायचे त्यांचे पुढे काय झालं? याचा विचार कोणी केलाय का? जे लोक त्यावेळी हे वाद्य दुरुस्त करायचे वाद्य बनवायचे त्यांचा पुढे काय झालं? हा विचार कोणी केलाय का? तर नाही. असे अनेक सुर घडवणारे हात मुंबईमध्ये होते. मात्र, त्यांचे पुढे काय झाले हे कोणालाच माहीत नाही. याचा शोध घेण्यासाठी आम्ही अख्खी मुंबई पालथी घातली. मात्र, त्याचवेळी आम्हाला कुर्ल्यात एक वाद्यांचे दुकान दिसलं जिथून हार्मोनियमचे मधुर सूर कानावर पडत होते.
गिरणी कामगार आणि 40 वर्षांचा इतिहास : आम्ही जेव्हा या हार्मोनियमच्या दुकानात गेलो आणि त्यांच्याकडून या दुकानाची माहिती घेतली त्यावेळी कळले की, आम्ही ज्यांचा शोध घेत आहोत असे सुर घडवणारे हात काळाच्या ओघात आता इथे आलेत. या दुकानाचे नाव आहे सर्वेश्वर म्युझिकल नारायण धोंडीबा थोरवे अँड सन्स. हे दुकान कुर्ल्यातील बहुचर्चित असलेल्या सर्वेश्वर मंदिर मार्ग येथे असून याचा 40 वर्षांचा इतिहास आहे. हे दुकान सध्या नंदकुमार थोरवे आणि त्यांची भावंडं चालवतात. सध्या थोरवे त्यांच्या दुकानात वाद्यांची दुरुस्ती आणि निर्मिती करत असतात.
इथं मिळतात पारंपरिक वाद्य : हा व्यवसाय नंदकुमार थोरवे यांच्या वडिलांनी सुरू केला. आज नंदकुमार थोरवे आणि त्यांची सहा भावंड हा व्यवसाय सांभाळत आहेत. त्यांच्या दुकानात गेल्यावर कळते आजही त्यांचं काम जोरात सुरू आहे. खरे पाहिले तर पारंपारिक वाद्यांचे अनेक प्रकार आहेत. ढोलक, ढोलकी, पखवाज, मृदूंग, तबला, गिटार, हार्मोनियम, नगारा, गाजी ढोल, बोँगो, कोंगो, कच्छी ढोल, पंजाबी ढोल, ताशा ई. प्रकारचे वाद्य इथे बनवून मिळतात. वाद्य बनवताना त्यांच्या सुरांची, तालाची योग्यता तपासूनच ग्राहकांच्या हातात वाद्य सुपूर्त केले जातात.
अशी झाली व्यवसायाला सुरुवात : आपल्या दुकाना बद्दल माहिती देताना ईटीव्हीशी बोलताना नंदकुमार थोरवे सांगतात की, "माझे वडील लहानपणी मुंबईला कामाच्या शोधात आले. मुंबईत आल्यावर त्यांनी इकडे भरणारे भजन, नाटक यांचे फड बघितले, इथे वाजवली जाणारी वाद्य बघितली. त्यानंतर त्यांनी वाद्य निर्मितीच काम शिकले आणि 1985 रोजी स्वतःचा व्यवसाय सुरु केला. आज हा वडिलोपार्जित व्यवसाय आम्ही सहा भावंडे सांभाळतो. संपुर्ण महाराष्ट्रात थोरवे अँड सन्स हे नाव असून आम्ही तयार केलेल्या वाद्यांना मागणी आहे. त्याच बरोबर ही वाद्य परदेशी सुध्दा पाठविली जातात. जास्त करून युरोपमध्ये हार्मोनियमची विक्री केली जाते. हार्मोनियम ही स्पेशलीटी असल्यामुळे ते जास्त तयार करण्यात येत. त्याच बरोबर तबला, डग्गा, पकवाज, गिटार, ढोलकी, असे अनेक वाद्य हाताने तयार केली जातात.
लॉकडाऊनचा उद्योगावर परिणाम : पुढे थोरवे सांगतात की, बदल हा निसर्गाचा नियम आहे. आज कालची तरुण पिढीला नवीन वाद्यांची आवड आहे मात्र मुख्यतः पारंपरिक वाद्य बंद होऊ शकत नाहीत. ती सुरूच राहणार. कारण, हार्मोनियम हा स्वरांचा पाया आहे. हार्मोनियम हा बेस आहे. तो तुमच्या गायनाला एक भक्कम आधार देतो. तुम्हाला जर गाणे शिकायचे असेल तर आधी ते हार्मोनियमवरच शिकावे लागते. कोरोनाच्या आधी दुकानाची परिस्थिती चांगली होती. मात्र, लॉकडाऊन नंतर कामगार कमी करावे लागले. आता स्वतः भावंडं काम करून आमचा उदरनिर्वाह करत असतो. त्याच बरोबर कोणाला ही कला शिकायची असेल तर आम्ही शिकवायला तयार आहोत. मात्र तासंतास बसून काम करावं लागत त्यामुळे तरुण पिढी या क्षेत्राकडे आता वळत नसल्याचं देखील नंदकुमार थोरवे यांनी सांगितले.