नवी मुंबई - दारू पिण्याच्या वादातून तीन मित्रांनी त्यांच्याच मित्राचा खून केल्याची घटना तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. नितेश दुबेदी (१५) असे मृत मुलाचे नाव असून तो व्यसनाधीन होता. त्याला दारु, चरस, भांग पिण्याचे व्यसन असल्याने मित्रांच्यासोबत कळंबोली परिसरात तो चोरी करून त्या पैशात व्यसन करत होता.
कळंबोली परिसरात आढळून आला होता अल्पवयीन मुलाचा मृतदेह
कळंबोली परिसरात 23 जुलैला एका अल्पवयीन मुलाचा मृतदेह आढळून आला होता. त्यानुसार पोलिसांनी तपास केला असता तो मृतदेह नितेश सुनील दुबेदी (१५, खारघर) येथे राहणाऱ्या अल्पवयीन मुलाचा असल्याची माहिती मिळाली. मृत मुलाचे कुटुबीय पूर्वी कळंबोली येथे राहत होते. ते दोन महिन्यांपूर्वी खारघर येथे राहण्यास गेले होते. मृत नितेश याला व्यसन होते. आपल्या व्यसनांची गरज भागविण्यासाठी संबंधित अल्पवयीन तरूण मित्रांच्या मदतीने कळंबोली परिसरात छोट्या-मोठ्या चोऱ्या देखील करत होता.
दारूचा वाद
मृत नितेश हा कळंबोली परिसरात त्याच्या दोन मित्रांसह दारू पिण्यासाठी बसला होता. त्याचवेळी त्या ठिकाणी त्यांचा तिसरा मित्र देखील आला. मृत मुलाने तू येथे दारू पिण्यास का आलास? असा जाब विचारला व हाताने मारहाण केली. त्यामुळे त्यांच्यात वादविवाद झाला. मृतासह त्याचे इतर मित्र दारूच्या नशेत असल्याने त्याच्या तिन्ही मित्रांनी ठोसे व काठीने नितेशला मारहाण केली. त्यातच त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी मित्रांना घेतले ताब्यात
सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदार यांच्या मदतीने पोलिसांनी मृत नितेशच्या तिन्ही मित्रांना ताब्यात घेतले. शिवाय त्यातील एक आरोपी हा अल्पवयीन असल्याने त्याला बालन्यायालय कर्जत येथे कार्यवाही कामी हजर करण्यात आले आहे.
हेही वाचा - ड्रग्स प्रकरणी अभिनेता गौरव दीक्षितला एनसीबीकडून अटक