मुंबई - शहरात दहीहंडी हा सण मोठा उत्साहात साजरा केला जातो. दहीहंडी फोडताना दरवर्षी शेकडो गोविंदा जखमी होतात. यावर्षी मुंबईत मोठ्या आयोजकांच्या दहीहंड्या नसल्या तरी छोट्या हंड्या अनेक ठिकाणी लावण्यात आल्या आहेत. या हंड्या फोडताना गोविंदा जखमी झाल्यास त्याच्यावर त्वरित उपचार करता यावेत, यासाठी मुंबई महानगर पालिकेची सर्व रुग्णालये सज्ज असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
दहीहंडी सणानिमित्त राजकीय नेत्यांच्या, सामाजिक संस्थांच्या दहीहंड्या मुंबईत आयोजित केल्या जातात. यावर्षी महाराष्ट्र्रात सातारा, कोल्हापूर, कोकणात पूर आल्याने या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेक मोठ्या दहीहंड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मोठ्या दहिहंड्या रद्द केल्या असल्या तरी अनेक सामाजिक संघटनांनी दहीहंड्या आयोजित केल्या आहेत.
हंड्या फोडण्यासाठी येणाऱ्या गोविंदा पथकात अनेकवेळा सुरक्षेची काळजी घेतली जात नाही. अनेकवेळा थर लावताना उंचावरून खाली पडल्याने गोविंदा जखमी होतात. त्याच्या डोक्याला मार लागतो. काही वेळा हात-पाय फ्रॅक्चर होतात, अशा गोविंदांना उपचारासाठी जवळच्या पालिका रुग्णालयात दाखल केले जाते. जखमी गोविंदावर ट्रॉमा आणि आर्थोपेडिक वॉर्डमध्ये उपचार केले जातात.
त्यामुळे पालिकेने यावर्षीही जखमी गोविंदांवर उपचार करण्यासाठी आपली पालिका रुग्णलाये सज्ज ठेवली आहेत. सायन, केईएम, नायर रुग्णालयासह इतर विभागीय रुग्णालयातील आर्थोपेडिक आणि ट्रॉमा डॉक्टरांना सज्ज ठेवण्यात आले आहे. प्रत्येक रुग्णालयात आर्थोपेडिक आणि ट्रॉमा विभागात 2 बेड जखमी गोविंदांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. शस्त्रक्रिया विभाग, एक्स रे विभाग 24 तास सुरु ठेवण्यात येणार आहेत.