Coronavirus : जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करणाऱ्या पालिका कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू - कोरोना विषाणू
जीवनावश्यक वस्तूंचे आणि खाण्याचे वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

मुंबई - कोरोनाची लागण सर्वत्र होत असताना गरजू नागरिकांना पालिकेकडून जीवनावश्यक वस्तूंचे आणि खाण्याचे वाटप केले जात आहे. या कामासाठी नियुक्त केलेल्या जी उत्तर विभागातील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मुंबईत 6 हजारच्या सुमारास कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. हे रुग्ण ज्या-ज्या विभागात आढळून आले आहेत. त्या विभागाला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहिर करण्यात आले आहे. या विभागातील नागरिकांना त्या क्षेत्राच्या बाहेर जाण्यास तसेच त्या क्षेत्रात बाहेरील लोकांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. या विभागातील सर्व दुकानेही बंद ठेवण्यात येतात.
त्यामुळे अशा विभागातील नागरिकांना तसेच हातावर पोट असलेल्या कामगारांची उपासमार होऊ नये, म्हणून पालिकेने अन्नधान्य तसेच रेडिमेड जेवणाची पाकीट पोचवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पालिकेने प्रत्येक विभागात अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक केली. अशाच कामासाठी नियुक्त केलेल्या जी उत्तर विभागातील निरीक्षक या पदावरील कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्या कर्मचाऱ्याला कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. याचा निषेध आज केला जाणार आहे.