मुंबई- शहरातील रस्त्यांवर खड्डे पडत असल्याने पालिकेवर नेहमीच टीका होत आली आहे. यावर उपाय म्हणून शहरातील रस्ते बनवताना प्लास्टिकचा वापर करावा, असे परिपत्रक प्रशासनाकडून काढण्यात आले आहे. टाकाऊ प्लास्टिकचा वापर डांबराच्या मिश्रणात केला जाणार असून त्याच्या सहाय्याने रस्त्याची निर्मिती होणार आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी येत्या १५ फेब्रुवारीपासून करावी, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
प्लास्टिक कचऱ्याचा वापर करून रस्ते बनवण्याची मागणी जून २०१६ मध्ये तत्कालीन काँग्रेसचे नगरसेवक राम आशिष गुप्ता यांनी केली होती. मुंबई महापालिकेने २५ नोव्हेंबर २०१९ रोजी परिपत्रक काढले असून त्यामध्ये त्यांनी प्लास्टिक कचऱ्याचा वापर रस्ते कामांमध्ये करण्याच्या सूचना केल्या आहेत. रस्त्यांच्या बांधकामामध्ये डांबर मिश्रणात प्लास्टिक कचर्याचा वापर करण्यासंदर्भात इंडियन रोड काँग्रेसच्या नियमावलीमधील मार्गदर्शक तत्वानुसार १५ फेब्रुवारीपासून बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच महापालिकेच्या नोंदणीकृत असलेल्या सर्व अस्फाल्ट प्लांटधारकांनाही प्लास्टिक कचऱ्याचा वापर करून डांबर मिश्रण बनवण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे.
रस्ते विभागाचे प्रमुख अभियंता संजय दराडे आणि अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांच्या स्वाक्षरीने हे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. मुंबई महापालिकेने दोन वर्षांपूर्वी प्लास्टिक बंदी लागू केली. प्लास्टिक बंदी दरम्यान पालिकेने कारवाई करून ७५ हजार किलोहून अधिक प्लास्टिक जप्त केले आहे. यामधील काही प्लास्टिक पुनर्प्रक्रिया करण्यासाठी दिले जाते. त्यानंतरही काही प्लास्टिक तसेच राहते. या प्लॅस्टिकचा तसेच इतर टाकाऊ प्लास्टिक डांबर मिश्रणात वापरले जाणारे आहे. यामुळे मुंबईकरांना चांगले टिकाऊ रस्ते मिळतील, अशी अपेक्षा पालिका प्रशासनाला आहे. या प्लास्टिक कचऱ्याचा वापर शॅम्पू बॉटल्स, बाटल्यांची झाकणे, प्लास्टिक पिशव्या, दुधाच्या पिशव्या, बीन लायनिंग, सौदर्यप्रसाधन वस्तूंची आवरणे, घरातील टाकावू प्लास्टिक डांबराचे मिश्रण बनवताना वापरावे, असे परिपत्रकात नमूद केले आहे.