मुंबई - राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. जनजीवन पूर्वपदावर येत असताना निर्माण झालेली लॉकडाऊनच्या स्थितीबाबत मुंबईकरांना काय वाटते, हे जाणून घेण्यासाठी ईटीव्ही भारताचा हा विशेष रिपोर्ट...
रविवारी संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. रुग्णवाढीची आकडेवारी आणि नागरिक शिस्तपालन करतात की नाही, हे तपासून टाळेबंदी लागू करण्याबाबत आठ-दहा दिवसांनी निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांमध्ये लॉकडाऊनची धास्ती वाढू लागली आहे. 'निर्बंध अधिक कडक करा पण, लॉकडाऊन करू नका' असे मत सर्वसामान्या मुंबईकरांनी व्यक्त केले आहे.
लॉकडाऊन राज्य सरकारचे अपयश लपवण्यासाठी तर नाही ना?
मागील वर्षी कोरोनाबाबत कुणालाही अधिक माहिती नव्हती. यामुळे अनेक देशांमध्ये अचानक लॉकडाऊन करावा लागला होता. मात्र, आता कोरोनाबाबत सर्वांना माहिती उपलब्ध झाली आहे. लसही तयार झाली आहे. असे असताना महाराष्ट्रात पुन्हा लॉक करण्याची गरज काय आहे? आता रुग्णसंख्या वाढते आहे, यामागे सरकारचे गाफील असणे कारण आहे का? सर्वसामान्य नागरिकांना नोकरी नाही. अनेकांना एक वेळेचे अन्न देखील मिळत नाही. हे लॉकडाऊन राज्य सरकारचा अपयश लपवण्यासाठी तर नाही ना? असे कुठेतरी वाटत आहे आहे, असे नागरिक निलेश साळवी यांनी सांगितले.
हातावर पोट असणाऱ्यांची होईल उपासमार -
राज्य सरकारने लॉकडाऊन करू नये, असे आमचे म्हणणे आहे. आता कुठे सर्व पूर्वपदावर यायला सुरुवात झाली होती. पुन्हा एकदा टाळे बंदी झाली तर आम्ही हातावर पोट असणाऱ्यांनी काय करायचे, असा प्रश्न आमच्या समोर उभा राहील. राज्य सरकारने कडक नियम केले तरी चालतील मात्र, लॉकडाऊन करू नये, असे राजेश चिपळूणकर यांनी सांगितले.
फक्त नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करावी -
काही नागरिक नियम पाळतात तर काही नाही पाळत. जे नियम पाळत नाही त्यांच्यावर कारवाई करावी. काही निवडक लोकांमुळे सरसकट लॉकडाऊन करून, नियम पाळणाऱ्यांना संकटात टाकू नये. पुन्हा कडक लॉकडाऊन झाला तर मध्यमवर्गीय व्यक्ती कायमचा खचून जाईल, असे भीमराव गवळी यांनी सांगितले.
पुन्हा जातील नोकऱ्या -
मागच्या लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यात माझाही समावेश होता. मला आत्ताच नवीन नोकरी मिळाली आहे. मात्र, पुन्हा लॉकडाऊन झाले तर परत एकदा नोकरी जाईल का? अशी भीती वाटू लागली आहे. सर्व पूर्वपदावर येत असताना लॉकडाऊन करू नये, असे मत अनिरुद्ध साळवे या तरुणाने व्यक्त केले.
हातावर पोट असणाऱ्यांची सरकारने अगोदर सोय करावी -
कोरोना विषाणू सोबत कसे लढायचे, हे आता नागरिकांना गेल्या एक वर्षात कळून चुकले आहे. नागरिक योग्यप्रकारे काळजी देखील घेताना दिसत आहेत. त्यामुळे एकदम कडक लॉकडाऊन करण्याची गरज नाही. जर लॉकडाऊन करण्याची स्थिती निर्माण झालीच तर हातावर पोट असणाऱ्यांची सरकारने अगोदर सोय करावी, असे मत माजी नगरसेवक नामदेव उबाळे यांनी व्यक्त केले.
पुन्हा लॉकडाऊन झाल्यास उपासमारीची वेळ येऊ नये -
गेल्या एका वर्षात सरकारने जे नियम सांगितले, त्या नियमाचे पालन आम्ही केले आहे. या काळात अनेक लोक बेरोजगारही झाले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे वांदे झाले आहेत. पुन्हा लॉकडाऊन झाले तर कोणावर उपासमारीची वेळ येऊ, नये असे अविनाश कदम म्हणाले.