मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. कोरोना रुग्णांची आकडेवारी कमी करण्यासाठी पालिका सतत प्रयत्न करत आहे. मात्र मुंबईकरांकडून म्हणावी तशी साथ मिळत नसल्याचे दिसत आहे. यामुळे मुंबई महापालिकेने मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई म्हणून दंडाच्या रक्कमेत दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या हा दंड २०० रुपये असून आता ही रक्कम ४०० रुपये इतकी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
मुंबईत कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण मार्च महिन्यात आढळून आला होता. तेव्हापासून गेले सहा महिने मुंबई महापालिका रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याला काही प्रमाणात नागरिकांची साथ मिळाली आहे. ऑगस्ट महिन्यात असलेल्या धार्मिक सणापासून मुंबईत पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. त्यातच पश्चिम उपनगरातील अंधेरी ते दहिसर, ग्रांटरोड, मुलुंड, भांडुप आदी परिसरात रुग्णांची संख्या वाढत आहे. या विभागातील रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी पालिकेने अनेक उपाययोजना केल्या आहेत. मात्र, नागरिकांकडून मास्क न वापरणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे असे प्रकार केले जात असल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी मुंबईमधील अनेक विभागात आपली पालिकेची गाडी न वापरता भेट दिली होती. या ठिकाणी त्यांनी आपली ओळख न दखवता पाहणी केली, त्यात ६० ते ७० टक्के नागरिक मास्क वापरात नसल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे नागरिकांना सांगूनही दुर्लक्ष केले जात असल्याने मास्क न वापरण्यासाठीच्या दंडाच्या रक्कमेत दुप्पट करण्याचा निर्णय घेतल्याचे काकाणी यांनी सांगितले.
मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यावर हा आजार संसर्गजन्य असल्याने महापालिकेने रस्त्यावर थुंकणाऱ्या आणि मास्क न लावणाऱ्या नागरिकांकडून १ हजार रुपये दंड वसूल करण्यास सुरुवात केली होती. २० एप्रिल ते १ ऑक्टोबर दरम्यान १८ हजार ११८ जणांवर कारवाई करत पालिकेने ६० लाख ४८ हजार ५०० रुपये इतका दंड वसूल केला होता. मिशन बिगिन अगेन अंतर्गत मुंबईमधील व्यवहार सुरू होत असल्याने नागरिकांनी मास्क वापरावे, असे आवाहन पालिकेने केले होते. त्याचवेळी मास्क न लावण्याबाबतच्या दंडाची रक्कम १३ सप्टेंबरपासून पालिकेने २०० रुपये इतकी केली. तर, १३ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान १३ हजार १३७ जणांवर कारवाई करत पालिकेने २६ लाख ७९ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. आतापर्यंत पालिकेने सुमारे ४० हजार नागरिकांकडून मास्क न लावल्याने सुमारे १ कोटी ५ लाखांचा दंड वसूल केला आहे. मात्र, त्यानंतरही नागरिक मास्क लावत नसल्याने पालिकेने दंडाच्या रक्कमेत दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतला असल्याचे काकाणी यांनी सांगितले.
मुंबईतील रुग्णांची आकडेवारी -
मुंबईत काल (सोमवारी) कोरोनाचे 1 हजार 620 नवे रुग्ण आढळून आले असून 36 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 30 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 28 पुरुष तर 8 महिला रुग्ण आहेत. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 31 हजार 70 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 9 हजार 466 वर पोहचला आहे. मुंबईमधून आज 1 हजार 968 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 1 लाख 95 हजार 773 वर गेला आहे. सध्या मुंबईत 22 हजार 693 सक्रिय रुग्ण आहेत.
हेही वाचा - मंदिरे खुली करण्यासाठी भाजपा आक्रमक; मुंबईत पोलिसांची कारवाई