मुंबई - सागरी संशोधन क्षेत्रातील शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी मुंबई विद्यापीठ आणि युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियातील ओशियन इंस्टीट्यूट यांच्यात शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला आहे. यामुळे सागरी विज्ञान क्षेत्रातील संशोधनाचे अनेक पर्याय उपलब्ध होणार आहेत.
मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात आयोजित कार्यक्रमात वेस्टर्न ऑस्ट्रेलिया येथील मा. प्रीमिअर मार्क मॅकगोवन आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी या करारावर सह्या केल्या.
या कार्यक्रमासाठी युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया येथील ओशिएन इंस्टीट्यूटचे संचालक पीटर वेथ, कमिश्नर पीटर बाल्डवीन, डेप्युटी डायरेक्टर जेनिफर मॅथ्यू, काऊन्सल जनरल टोनी हूबर, डायरेक्टर एज्युकेशन साऊथ आशियाचे जमाल कुरैशी यांच्यासह मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलसचिव डॉ. अजय देशमुख, शैक्षणिक समन्वयक प्रा. विनायक दळवी, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, विविध विद्याशाखेचे अधिष्ठाता आणि सिंधू स्वाध्याय संस्थेचे प्राध्यापक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा करार पार पडला.
राज्याला लाभलेला ७२० किमी.चा सागरी किनारा या भूभागात रोजगाराच्या अनेक संधी आहेत. त्या तरुणांपर्यंत पोहचविण्यासाठी मुंबई विद्यापीठाने हा महत्वाकांक्षी प्रकल्प साकारला आहे. यामधून निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधीसाठी मुंबई विद्यापीठाने सिंधू स्वाध्याय संस्था स्थापन केली असल्याचे मुबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी सांगितले.
सध्याच्या सागरी विज्ञान अभ्यासक्रमांमध्ये आमुलाग्र बदल करुन त्यात अभिनव तंत्रज्ञानाचा, प्रगत शैक्षणिक धोरणांचा आणि प्रगत ज्ञानशाखांचा अवलंब करण्यात येणार आहे. जागतिक स्तरावर नैसर्गिक स्त्रोतांचा अधिकाधिक वापर झाल्यामुळे त्यांची होणारी अतिरिक्त झीजही थांबवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच, या संस्थेच्या माध्यमातून शास्त्रीय अभ्यास आणि संशोधन करण्यावर अधिक भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
या दोन्ही उभय देशातील सागरी किनाऱ्यालगत असलेल्या राज्यांना सागर विज्ञान आणि तंत्रज्ञान यासंदर्भात केलेल्या प्रगतीचा फायदा मिळणार आहे, असे सिंधू स्वाध्याय संस्थेचे समन्वयक प्रा. विनायक दळवी यांनी सांगितले.
या करारान्वये दोन्ही विद्यापीठाना सागरी संशोधनाच्या क्षेत्रातील अनेक घटकांवर रितसर संशोधन करुन शास्त्रीय अभ्यास करण्यास मोठी मदत होणार असल्याचा आशावाद पीटर वेथ यांनी व्यक्त केला. तर, या कराराच्या माध्यमातून दोन्ही देशातील विद्यापीठातील विद्यार्थ्यांना समुद्री विज्ञान क्षेत्रातील ज्ञानाची कवाडे खूली होणार असून याद्वारे माहितीचे आदान-प्रदान होणार होईल. तसेच, याचा विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार असल्याचे मत वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे प्रीमिअर मा. मार्क मॅकगोअन यांनी व्यक्त केले.