मुंबई Mumbai University Paper Leak : मुंबई विद्यापीठाकडून घेण्यात येणाऱ्या टी.वाय.बी.कॉमच्या (सत्र-5) परीक्षेपूर्वी उत्तरपत्रिका व्हॉट्सॲपवर आल्याचा प्रकार सिद्धार्थ महाविद्यालयातसमोर आलाय. याप्रकरणी पर्यवेक्षक सुमेध जगन्नाथ माने यांच्या तक्रारीवरून आझाद मैदान पोलिसांनी दोन विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. सध्या मुंबई विद्यापीठाची हिवाळी सत्राची परीक्षा सुरु आहे. त्यादरम्यान हा प्रकार उघडकीस आला.
व्हाट्सॲप वर कॉमर्सची प्रश्नपत्रिका : तक्रारदार सुमेध जगन्नाथ माने हे सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करतात. सिद्धार्थ कॉलेजमध्ये सध्या टी वाय बी कॉम सेमिस्टर -5 ची परीक्षा सुरू आहे. परीक्षेदरम्यान 31 ऑक्टोबरला सकाळी साडेदहा ते दीड वाजण्याच्या दरम्यान टी वाय बी कॉम सेमिस्टर 5 च्या कॉमर्स-पाच या विषयाचा पेपर होता. यासाठी सुमेध माने यांची परीक्षा हॉलमध्ये कनिष्ठ पर्यवेक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यावेळी परीक्षा हॉलमध्ये परीक्षार्थी अंश मेघजी संदा हा वीस वर्षीय विद्यार्थी परीक्षेला बसलेला असताना त्याच्या मोबाईल फोनमधील व्हाट्सॲपवर कॉमर्स पाच या विषयाची प्रश्नपत्रिका आणि ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांची उत्तरं असल्याचं कनिष्ठ पर्यवेक्षक सुमेध माने यांच्या निदर्शनास आलं.
दोन परीक्षार्थींविरुद्ध गुन्हा दाखल : परीक्षार्थी अंश संदा याच्याकडे असलेला मोबाईल फोन पर्यवेक्षक माने यांनी ताब्यात घेतला. तसंच परीक्षार्थीकडील मोबाईल फो मध्ये मिळून आलेली प्रश्नपत्रिका याच्यावरील वॉटरमार्क नंबर हा माने यांच्या परीक्षा केंद्राचा नसून तो अन्य परीक्षा केंद्राचा असल्याचं माने यांना समजलं होतं. आरोपी परीक्षार्थी अंश हा गिरगाव चौपाटी परिसरातील कॉलेजचा विद्यार्थी आहे. त्याला कॉमर्स 5 या विषयाची प्रश्नपत्रिका त्याच्या मित्राकडून मिळाली होती. अंशचा मित्र सुरज यानं 31 ऑक्टोबरला सकाळी 9 वाजून 37 मिनिटांनी आरोपी अंशला व्हाट्सॲपद्वारे पाठवली होती. त्यामुळं या प्रकरणात आरोपी अंशचा मित्र सुरज याला देखील सहआरोपी बनवण्यात आल्याची माहिती आझाद मैदान पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिलीय.
विविध कलमान्वये गुन्हा दाखल : या घटनेच्या अनुषंगानं तक्रारदार माने यांच्या सिद्धार्थ कॉलेज प्रशासनातर्फे मुंबई विद्यापीठ या ठिकाणी तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीवरून आझाद मैदान पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम 417, 420, 34 सह महाराष्ट्र विद्यापीठ मंडळाच्या व इतर विनिर्दिष्ट परीक्षांमधील गैरप्रकार प्रतिबंध अधिनियम कलम 6, 7, 8 अन्वये परीक्षार्थी अंश संदा आणि त्याला व्हाट्सॲप वर प्रश्नपत्रिका पाठवणारा मित्र सुरज या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
हेही वाचा :