मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या बी. एड्. सत्र ४ या परीक्षेचा निकाल गुरुवारी (17 जून) जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेचा निकाल ८२.१० टक्के लागला आहे. ही परीक्षा ऑनलाइन घेण्यात आली होती.
३ हजार ६६० विद्यार्थी उत्तीर्ण
मे २०२१ मध्ये संपन्न झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या बी. एड्. सत्र ४ परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. या परीक्षेत एकूण ३ हजार ६६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला ४ हजार ४७१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४ हजार ४५८ एवढे विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ठ झाले होते. तर १३ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तसेच या परीक्षेत १५ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.
येथे पहा निकाल
या परीक्षेचा निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळ http://www.mumresults.in/ यावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. उमेदवार या संकेतस्थळावर जाऊन आपला निकाल पाहू शकतात.
आजपर्यंत १२ परीक्षांचे निकाल जाहीर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने उन्हाळी सत्राच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतल्या आहेत. मुंबई विद्यापीठाने उन्हाळी सत्राचे आतापर्यंत १२ परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. आज तृतीय वर्ष बीए जर्मन स्टडीज सत्र ६, एमएफएसएम तृतीय वर्ष सत्र २, बी. एड्. सत्र ४, आर्किटेक्चर चौथे वर्ष असे ४ निकाल जाहीर करण्यात आले आहेत.
हेही वाचा - पुणे मायलेक हत्याकांड अपडेट: कारच्या दारावर रक्ताचा सडा, चिमुकल्याच्या रक्ताळलेल्या सँडल, पतीवर संशय