मुंबई Atal Setu Mumbai Bridge : 12 जानेवारी रोजी पंतप्रधानांच्या हस्ते मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (अटल सेतू) पुलाचं उद्घाटन करण्यात आलं. या पुलावर दुचाकी, तीनचाकी वाहनांना प्रवेश बंदी आहे. तसंच चारचाकी वाहनांसाठी ताशी 100 किमी वेगाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तसंच या पुलावर कोणत्याही परिस्थितीत विनाकारण वाहनं थांबविण्यास मनाई करण्यात आली आहे.
काही वाहनधारक अटल सेतूवर वाहनं थांबवून सेल्फी घेत असल्याचं निदर्शनास आलं आहे. अटल सेतू पिकनिक स्पॉट नसून या पुलावर कोणी सेल्फी घेताना दिसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल - प्रवीणकुमार पडवळ, पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग
300 हून अधिक जणांना दंड : अटल सेतू पुलावर थांबून सेल्फी घेणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येत असून वाहतूक पोलिसांनी 300 हून अधिक वाहनचालकांकडून 500 रुपयांचा दंड वसूल केला आहे. असंच उल्लंघन होत, राहिल्यास एफआयआर नोंदवला जाईल, असा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे.
रिक्षाचालकावर गुन्हा दाखल : तसंच काल अटल सेतूवर बेदरकारपणे रिक्षा चालवल्याप्रकरणी रिक्षाचालक रामनाथ गणपत लांडगे (वय 46) याच्याविरुद्ध शिवडी पोलीस ठाण्यात भादंवि कलम 379, 336, 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटल सेतूवर बेकायदेशीररीत्या वाहन पार्क केल्याप्रकरणी रिक्षाचालक लांडगे याच्याविरुद्ध स्वत:सह इतरांचा जीव धोक्यात घातल्याप्रकरणी सीआरपीसी 41(1)(अ) अन्वये नोटीस देऊन मुक्त करण्यात आल्याची माहितीही देशमुख यांनी दिली आहे.
पोलिसांची कारवाई सुरू : मुंबईतील शिवडी ते नवी मुंबईतील न्हावा शेवा दरम्यानच्या 21.8 किलोमीटर लांबीच्या सागरी सेतूचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 12 जानेवारी रोजी उद्घाटन करण्यात आलं होतं. त्यानंतर हा पूल नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळं अटल सागरी सेतूवर फोटो काढण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. काही नागरिकांनी पुलावर चालणाऱ्या लोकांचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर मुंबई, नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी तातडीनं कारवाई सुरू केली. दक्षिण-मध्य सहाय्यक पोलीस आयुक्त अब्दुल सय्यद, वडाळा वाहतूक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक शरद पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकांनी मोटार वाहन कायद्याच्या कलम 122, 177 अंतर्गत 120 जणांवर उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे, असं मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं.
'नो स्टॉपिंग' बोर्ड लावण्यास सांगितलं : वाहतूक विभागाचे सह पोलीस आयुक्त, प्रवीणकुमार पडवळ यांनी वाहनधारकांना त्यांची वाहने अटल सेतू येथे थांबवू नये, पुलावरून उतरू नये, असं आवाहन केलं आहे. पुलावर ‘नो स्टॉपिंग’चे फलक लावण्याच्या सूचना आम्ही एमएमआरडीएला केल्या आहेत, असं पडवळ यांनी म्हटलंय.
हेही वाचा -